इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२२) आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब (KKRvPBKS) या संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत पंजाबचा डाव १३७ धावांवर संपवला. उमेश यादवने कोलकातासाठी सर्वोत्तम कामगिरी करत ४ बळी मिळवले. त्याचवेळी कोलकाताचा सलामीवीर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने एक वैयक्तिक विक्रम नोंदविला.
छोटेखानी खेळीत पराक्रम
यावर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळणारा भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने १२ धावांची छोटी खेळी केली. त्याला कगिसो रबाडाने बाद केले. मात्र या खेळातही त्याने एक नवा विक्रम आपल्या नावे केला. त्याने, आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ४००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो नववा भारतीय व एकूण बारावा फलंदाज बनला. रहाणे याने १४४ डावांमध्ये ही कामगिरी केली.
आतापर्यंत राहिली जबरदस्त कामगिरी
अजिंक्य राहणे हा आयपीएल इतिहासातील एक मान्यवर फलंदाज मानला जातो. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स या संघांचे त्याने प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाने २०१८ आयपीएलच्या प्ले ऑफपर्यंत मजल मारली होती.
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या ९ बॉलमध्ये भानुकाने आणला बवंडर! पाहा झंझावाती खेळीचा व्हिडिओ (mahasports.in)