भारतीय संघाबाहेर असलेले खेळाडू स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत संघात परत येतात. असेच काहीसे भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)याच्याबाबतीत घडत आहे. तो मागील अनेक काळापासून भारताच्या संघाबाहेर असून स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये नेतृत्व करत उत्तम फलंदाजीही करत आहे. 2022चा शेवट द्विशतकाने करणाऱ्या रहाणेने 2023ची सुरूवातही चांगली केली आहे.
जानेवारी 2022च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर रहाणेने आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. यामुळे त्याने निराश न होता सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) हंगामात शतकी खेळी केली आहे. त्याने बुधवारी (11 जानेवारी) आसामविरुद्ध शतक पूर्ण केले आणि संघाची धावसंख्या 600च्या पार नेली.
रणजीच्या या पाचव्या सामन्याच्या पहिल्या दिवशी रहाणे अर्धशतक करत नाबाद होता. तो 140 चेंडूत 5 चौकारांच्या साहाय्याने नाबाद 73 धावा करत तंबूत परतला होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने 192 चेंडूत 8 चौकार मारत शतक पूर्ण केले. या हंगामातील त्याचे हे दुसरे शतक आहे. तो 302 चेंडूत 191 धावा करत बाद झाला.
रहाणेचे भारतीय संघात परतण्याचा प्रयत्न असून त्याने तयारीला सुरूवात केली. त्याने हैद्राबादविरुद्ध 261 चेंडूत 204 धावा करत सिद्ध केले. या खेळीत त्याने 26 चौकार आणि 3 षटकार मारले होते. आतापर्यंत त्याने 5 सामन्यातील 7 डावांमध्ये 78.66च्या सरासरीने 470 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याची ही कामगिरी नक्कीच कामी येईल अशी अपेक्षा आहे, कारण भारत पुढच्याच महिन्यात घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामने खेळणार आहे.
मुंबईच्या पहिल्या डावात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्या 379 धावा आणि रहाणेच्या 191 धावांमुळे त्यांनी पहिला डाव 4 विकेट्स गमावत 687 धावसंख्येवर घोषित केला. आसामची फलंदाजी सुरू झाली असून त्यांनी एकही विकेट न गमावता 49 धावा केल्या आहेत.
या हंगामात मुंबईने रणजीतील आंध्र प्रदेश आणि हैद्राबाद विरुद्धचे सामने जिंकले आहेत. तर सौराष्ट्रविरुद्धचा सामना गमावला असून तमिळनाडूविरुद्धचा सामना अनिर्णीत राहिला होता. आसामनंतर मुंबई दिलील आणि महाराष्ट्रविरुद्ध खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता, उमरानचा ‘तो’ चेंडू सर्वात वेगवान नव्हताच! क्रिकेटविश्वात नव्या वादाला सुरूवात
नादच नाद! ‘त्रिशतकवीर’ पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, केले अनेक रेकॉर्ड्स