मेलबर्न येथे चालू असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ५ बाद २७७ धावा करत ८२ धावांची आघाडी मिळवली आहे. यात भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेचा मोठा वाटा राहिला. रहाणेने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना करत नाबाद शतकी खेळी केली. यासह एका खास विक्रमाची रहाणेच्या नावे नोंद झाली आहे.
मेलबर्नच्या मैदानावर ठोकली २ शतके
भारतीय सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आणि कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या दिवशी १ बाद ३६ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना जास्त वेळ मैदानावर टिकू दिले नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने डावातील २२व्या षटकात गिलला झेलबाद केले. त्यानंतर लगेचच २४व्या षटकात पुजारालाही पव्हेलियनला पाठवले. त्यामुळे रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.
रहाणेने संयमी फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाचा डाव संपेपर्यंत २०० चेंडूत नाबाद १०४ धावा केल्या. दरम्यान त्याने १२ चौकार लगावले. मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत रहाणेचे हे दुसरे शतक होते.
यापुर्वी २०१४ मध्ये रहाणेने हा पराक्रम केला होता. त्यावेळी २१ चौकारांच्या मदतीने त्याने १४७ धावा केल्या होत्या. यासह यजमान ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध मेलबर्नच्या मैदानावर ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत दोन शतक ठोकणारा रहाणे पहिलाच पाहुणा खेळाडू ठरला आहे.
तेंडूलकरने बॉक्सिंग डे कसोटीत केलीत २ शतके
रहाणे व्यतिरिक्त फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने देखील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत २ शतके केली आहेत. पण त्यातील एक शतक त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (१९९९ साली) मेलबर्न येथे तर दुसरे शतक न्यूझीलंडविरुद्ध (१९९८ साली) वेलिंग्टन येथे केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS : रहाणे-जडेजाच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ ८२ धावांनी आघाडीवर
भारीच! मेलबर्नच्या मैदानावर शतक करणारा रहाणे केवळ दुसराच भारतीय कर्णधार; पाहा पहिलं नाव कुणाचं
रहाणेची विक्रमी कामगिरी! ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत शतक ठोकत झाला गांगुली, सचिनच्या यादीत सामील