टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी धडपड करत असलेला दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय. तो सध्या जारी इराणी चषकामध्ये शतक झळकावण्यापासून थोडक्यात चुकला, मात्र त्यानं आपल्या फलंदाजीनं संघाला संकटातून बाहेर काढलं.
अजिंक्य रहाणे 2024 इराणी चषकात मुंबईच्या संघाचं नेतृत्व करतोय. लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 97 धावांची खेळी खेळली. तो अशा वेळी फलंदाजीला आला, जेव्हा संघाच्या 6 धावांवर दोन विकेट पडल्या होत्या. 37 धावांवर तिसरी विकेटही पडली. मात्र यानंतर त्यानं एक टोक सांभाळून धरत चांगली भागीदारी केली.
अजिंक्य रहाणेनं इराणी चषकात ‘रेस्ट ऑफ इंडिया’विरुद्ध 234 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्यानं 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत 97 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 41.45 एवढा राहिला. 234 चेंडू खेळणं ही सुद्धा संघासाठी मोठी गोष्ट आहे, कारण एकेकाळी संघाला एवढी देखील धावसंख्या गाठता येणार नाही, असं वाटत होतं. अजिंक्य रहाणेनं खात्री केली की, तो एक टोक धरून राहील. त्यानं त्याच्या सहकाऱ्यांसह धावफलक सतत हलता ठेवला. सध्या संघाची धावसंख्या 290 च्या पुढे गेली आहे.
अजिंक्य रहाणेनं आधी श्रेयस अय्यरसोबत शतकी भागीदारी केली. यानंतर त्यानं सरफराज खानसोबतही अशीच खेळी केली. अय्यर 57 धावांची इनिंग खेळून बाद झाला. तर सर्फराजनंही अर्धशतक झळकावलं. ‘रेस्ट ऑफ इंडिया’कडून मुकेश कुमारनं 4 विकेट्स घेतल्या, तर यश दयालनं 2 विकेट्स घेण्यात यश मिळवलं. यश दयालनंच अजिंक्य रहाणेला विकेटच्या मागे बाद केलं. अर्धशतक झळकावल्यानंतर चांगली फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरला यश दयालनं बाद केलं.
हेही वाचा –
हत्येचा गुन्हा असलेला शाकिब बांगलादेशात परतणार नाही? या देशात स्थायिक होण्याची शक्यता
‘थाला’ची क्रेझ! धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्याचा 1200 कि.मी सायकल प्रवास
टीम इंडियाला धक्का! पुनरागमन करण्यापूर्वी स्टार खेळाडू पुन्हा जखमी