भारतीय क्रिकेट संघाने नवीन वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला त्यांच्या देशात जाऊन कसोटी मालिकेत पराभूत करण्याची ऐतिहासिक कामगिरी सलग दुसऱ्यांदा केली. या मालिकेत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मैदानात झुंजार कामगिरी केल्यानंतर, मैदानाबाहेरही आपल्या आचरणातून रहाणेने सर्वांची मने जिंकली. भारतात आल्यानंतर, ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय प्राण्याची प्रतिकृती असलेला केक कापण्यास त्यांनी नकार दिला होता. आता, आपल्या या कृतीविषयी रहाणेने स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
भारताने साजरा केला ऐतिहासिक मालिका विजय
नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मालिकेत पिछाडीवरून विजय मिळवला होता. बरेच अनुभवी खेळाडू संघात नसताना युवा खेळाडूंना हाताशी धरत रहाणेनी ही अफलातून कामगिरी करून दाखवली. त्यामुळे त्याचे सर्व आजी-माजी क्रिकेटपटू, जाणकार व क्रिकेटप्रेमींनी कौतुक केले. भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत २-१ ने विजय मिळवला होता.
ही कृती करत जिंकलेली मने
ऑस्ट्रेलियात विजयी झाल्यानंतर रहाणे जेव्हा दादरमधील आपल्या घरी परतला होता तेव्हा, शेजाऱ्यांनी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या कांगारूंच्या केकची प्रतिकृती कापण्यासाठी ठेवली होती. मात्र, रहाणेने तो केक कापण्यास नकार देऊन सर्वांची मने जिंकली. नुकतेच रहाणेने आपल्या या कृतीविषयी स्पष्टीकरण दिले आहे. एका मुलाखतीत बोलताना रहाणे म्हणाला, “कांगारू हा त्यांचा राष्ट्रीय प्राणी आहे. मी तो केक कापू इच्छित नव्हतो. आपण आपल्या प्रतिस्पर्ध्याचा आदर केला पाहिजे. आपण जिंकलो किंवा इतिहास घडविला तरीही त्यांच्याशी चांगलच वागायला हवे. म्हणूनच मी त्या दिवशी कांगारूची प्रतिकृती असलेला केक न कापण्याचा निर्णय घेतला.”
इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य
रहाणेने इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेविषयी बोलताना म्हटले, “आता मी संघाचा कर्णधार नसेल. एक खेळाडू म्हणून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असतो. ऑस्ट्रेलियात जे व्हायचे ते घडून गेले. आता इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचे माझे लक्ष आहे.”
काळजीवाहू कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात भूमिका पार पाडणाऱ्या अजिंक्य रहाणेने मेलबर्न कसोटीत दमदार शतक ठोकून भारताला विजयी केले होते. तसेच, अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनला भारतीय संघातील खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी भेट म्हणून दिलेली.
महत्वाच्या बातम्या:
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा, २ नवख्या खेळाडूंना मिळाली जागा
कार अपघातात मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डचा मृत्यू? जाणून घ्या खरं काय ते