भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याला ४ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ नॉटिंघम येथे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करेल. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनविषयी अद्याप कसलीही चर्चा झाली नसताना, संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने एका युवा अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान मिळू शकते अशी आशा व्यक्त केली आहे.
हा खेळाडू खेळू शकतो संघात
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने एका आभासी मुलाखतीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत कोण त्याच्यासारखी कामगिरी करेल? या प्रश्नाचे उत्तर देताना अजिंक्यने मुंबईकर शार्दुल ठाकूरचे नाव घेतले.
तो म्हणाला, “प्रत्येकजण वेगळ्या प्रकारचा खेळाडू असतो. २०१८ मध्ये हार्दिकने जे केले ते आमच्यासाठी वेगळे होते. शार्दुल फलंदाजी करू शकतो. तुम्ही त्याला ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करताना पाहिले आहे तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केलेली दिसून येते.”
शार्दुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत वॉशिंग्टन सुंदरसोबत दमदार भागीदारी करताना अर्धशतक झळकावले होते. तसेच, मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये देखील त्याच्या नावे सात अर्धशतके आहेत.
गोलंदाज देऊ शकतात योगदान
रहाणेने भारतीय गोलंदाजांच्या फलंदाजीतील योगदानाविषयी बोलताना म्हटले, “बुमराह, उमेश, शमी आणि सिराज हे आता नेटमध्ये फलंदाजीचा देखील सराव करत आहेत. या सर्वांकडून फलंदाजीत योगदान मिळणे, अपेक्षित असते. अखेरच्या २०-३० धावा नेहमी महत्त्वाच्या ठरतात.”
भारताचे वेगवान गोलंदाज फलंदाजीत योगदान देत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्टपणे जाणवते. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात याचा प्रत्यय आला होता.
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, अभिमन्यू ईस्वरन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, वृद्धिमान साहा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर व उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या –
“मला समजत नाही की क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी इतके उतावीळ का आहोत?”