आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (ICC World Test Championship) सध्या भारत ७१.७ सरासरी पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडची टीम ७० पॉईंट्स दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाची टीम ६९.२ इतक्या पॉइंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरी न्यूझीलंड यानंतर या स्पर्धेतील कोणतीही कसोटी मालिका खेळणार नसल्याने आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित केल्याने न्यूझीलंड या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. याबाबत भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने वक्तव्य केले आहे.
बुधवारी (३ फेब्रुवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत रहाणेने सांगितले की, “सध्या भारतीय संघाचे लक्ष फक्त इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेवर आहे. अद्याप बराच वेळ शिल्लक असल्याने आम्ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्याचा जास्त विचार करत नाहीत. न्यूझीलंडचा संघ हा उत्तम खेळला असून तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.”
“आता आम्ही इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असून एकावेळी फक्त एकाच सामन्यावर विचार करायची ही वेळ आहे. इंग्लंड हा एक चांगला संघ आहे. त्यामुळे आमच्या भारतीय संघाला देखील चांगली खेळी दाखवावी लागेल. ऑस्ट्रेलियामधील विजय ही भूतकाळाची बाब आहे. इंग्लंडचा आम्ही सन्मान करत असून आम्हाला आमचे लक्ष्य गाठायचे आहे, पाहुयात पूढे काय होईल”, असे रहाणेने शेवटी म्हटले.
अशी आहेत समीकरणे –
अंतिम सामन्याचे दुसरे तिकिट मिळवण्यासाठी सध्या भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात चूरस आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केल्याने आता त्यांनाही भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. या मालिकेच जर भारताने किमान २ सामने जिंकून विजय मिळवला तर भारतीय संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
तसेच जर या मालिकेत इंग्लंडने किमान ३ सामने जिंकून विजय मिळवला तर इंग्लंडला अंतिम सामना गाठण्याची संधी आहे. तसेच जर भारत इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका १-० फरकाने जिंकला किंवा भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवली किंवा भारत जर इंग्लंडविरुद्ध पराभूत झाला तर ऑस्ट्रेलिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
भारत विरुद्ध इंग्लड कसोटी सामने
पहिला सामना – ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी (चेन्नई)
दुसरी सामना – १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी (चेन्नई)
तिसरा सामना – २४ ते २८ फेब्रुवारी (अहमदाबाद)
चौथा सामना – ४ मार्च ते ८ मार्च (अहमदाबाद)
महत्त्वाच्या बातम्या-
दे घुमा के! कोहलीने केली धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची नक्कल, व्हिडिओ तूफान व्हायरल
“मागे उभारून कर्णधार कोहलीची मदत करणे, आता हेच माझे काम”, रहाणेचे मोठे भाष्य
भारत का इंग्लंड, चेन्नई कसोटीत कोणाचे पारडे जड? ‘अशी’ आहे आकडेवारी