भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक स्टार्स झाले आहेत, जे आपल्या खेळासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वानंही ओळखले जातात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तसेच टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड हे यापैकीच काही खेळाडू.
क्रिकेटपटूंच्या या एलिट लीस्टमध्ये अजिंक्य रहाणेच्या नावाचाही समावेश होतो. अजिंक्य रहाणे सध्या टीम इंडियातून बाहेर असला तरी त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. मंगळवारी रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबईच्या या कर्णधारानं असं काही केलं ज्यामुळे चाहते पुन्हा एकदा त्याचं कौतुक करू लागले आहेत.
अजिंक्य रहाणे सध्या मुंबईचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईनं रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आज सामन्याच्या चौथ्या दिवशी मुंबई ट्रॉफी जिंकण्याची दाट शक्यता आहे. मात्र सध्या आपण ट्रॉफीबद्दल नाही, तर रहाणेच्या सभ्यपणाबद्दल बोलतोय. रहाणेनं विदर्भविरुद्धच्या फायनलमध्ये क्रिकेटला ‘जंटलमन्स गेम’ का म्हणतात हे पुन्हा एकदा दाखवून दिलं.
रणजी फायनलच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे 73 धावांवर असताना हर्ष दुबेचा एक चेंडू त्याच्या बॅटला चाटून यष्टीरक्षकाकडे गेला. यष्टिरक्षक अक्षय वाडकरनं त्याचा सहज झेल घेतला. पण हे काय… अजिंक्य रहाणे पंचांच्या संकेताची वाट न पाहताच पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. तेव्हा चेंडू वाडकरच्या हातातच होता. तोपर्यंत पंचानं अजिंक्यला बाद दिलं नव्हतं. मात्र अजिंक्यला माहित होतं की तो बाद झाला आहे. त्यामुळे पंचाच्या निर्णयाची वाट न पाहताच तो मैदानाबाहेर गेला. पंच रिचर्ड केटलब्रो यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Ajinkya Rahane walks off before umpire raises finger 👏 that’s @ajinkyarahane88 for you #RanjiTrophyFinal #MUMvVID #AjinkyaRahane #RanjiTrophy pic.twitter.com/nvB7Rts7pG
— Richard Kettleborough (@RichKettle07) March 12, 2024
अंतिम सामना जिंकण्यासाठी मुंबई संघानं विदर्भाला 538 धावांचं अशक्य लक्ष्य दिले आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईनं 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ अवघ्या 105 धावांत गारद झाला. यानंतर मुंबईनं दुसऱ्या डावात 418 धावांचा डोंगर उभारला. मुशीर खान (136), श्रेयस अय्यर (95) आणि अजिंक्य रहाणे (73) यांनी मुंबईला या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाचं योगदान दिलं.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 पूर्वी बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई, RCB चे सामने कुठे खेळले जाणार?
‘या’ फलंदाजानं दारूच्या नशेत खेळली होती ऐतिहासिक खेळी, आजही विश्वविक्रम कायम
रोहित शर्मा अजूनही त्याचा आयपीएल संघ बदलू शकतो का? ट्रान्सफर विंडोचे नियम काय सांगतात?