ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत युवा खेळाडूंनी भरलेल्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तिसऱ्यांदा बॉर्डर- गावसकर ट्रॉफी पटकावली आहे. यानंतर जगात विजयाचा डंका वाजवून गुरुवारी (२१ जानेवारी) सर्व भारतीय खेळाडू मायभूमीत परतले आहेत. भारतात परतल्यानंतर सर्वांचेच उत्साहात स्वागत झाले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत प्रभारी कर्णधार म्हणून मोठे यश मिळवलेल्या अजिंक्य रहाणेचे त्याच्या सोसायटीतील जंगी स्वागत केले. यावेळी रहाणेने आपल्या पत्नीविषयी मजेशीर खुलासा केला आहे.
रहाणेची पत्नी राधिका धोपवकर हिने मायदेशी परतल्यानंतर त्याला घरी येताना चांगले कपडे घालून येण्याचा सल्ला दिला. याविषयी सोसायटीतील लोकांना सांगताना रहाणे म्हणाला की, “मी मुंबई विमानतळावर असताना राधिकाने मला फोन केला आणि घरी येताना चांगले कपडे घालून ये”, असे सांगितले. रहाणेचे हे वक्तव्य ऐकून उपस्थित लोकांमध्ये जोरदार हशा पिकला.
यानंतर पुढे बोलताना रहाणे म्हणाला की, “राधिकाचे बोलणे ऐकून, मला काही कळाले नाही की चांगली कपडे घातल्याने काय फरक पडेल? नंतर मी जेव्हा तिला याविषयी विचारले, त्यावर तिने मला उत्तर दिल की आर्याला चांगले वाटेल. ती खूष होईल.”
रहाणे आणि राधिका यांच्या लग्नाच्या वेळी एक गमतीशीर किस्सा घडला होता. जेव्हा पहिल्यांदा रहाणे राधिकाच्या घरी गेला होता, तेव्हा त्याने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. यावरुन राधिकाला रहाणेची कपड्यांची निवडी फार चांगली नसल्याचे खात्री पटली. तेव्हापासून राधिका प्रत्येक वेळी रहाणेला कपड्यांबद्दल सल्ला देत असते.
रहाणेचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ऑस्ट्रेलिया दौरा संपवून रहाणे मायभूमीत परतल्यानंतर त्याच्या माटुंग्यातील घराजवळ ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. यावेळी तो राहत असलेली पूर्ण सोसायटी त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होती. त्यांनी मोठ्या उत्साहाने त्याचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी रहाणेला पाहून त्याची दिडवर्षाची मुलगी आर्यादेखील त्याला बिलगली होती. तसेच त्याची पत्नी राधिकादेखील त्याच्यासोबच होती. रहाणेचे सोसायटीतील काही महिलांनी त्याचे औक्षणदेखील केले. रहाणेनेही कोणाला नाराज न करता सर्वांनी केलेले स्वागत स्विकारले. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
विराट पालकत्व रजेवर असल्याने रहाणेला नेतृत्वाची संधी
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला होता. त्यामुळे या कसोटी मालिकेतील उर्वरित ३ कसोटी सामन्यात रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
अजिंक्य रहाणेचे यश
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर विराटने पालकत्व रजा घेतल्याने उर्वरित सामन्यांत रहाणेने नेतृत्वाची जबाबदारी घेत संघाला मालिकेत पुनरागमन करुन दिले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने मेलबर्न आणि ब्रिस्बेन येथे कसोटीत विजय मिळवले, तसेच सिडनी येथे सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आले. त्यामुळे भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकून इतिहास घडवला.
महत्त्वाच्या बातम्या-
Video : ढोल-ताशांच्या गजरात ‘कर्णधार’ अजिंक्य रहाणेचं मुंबईत पारंपरिक पद्धतीने स्वागत
“बीसीसीआयने विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करण्याचा विचार करावा”, इंग्लंडच्या माजी खेळाडूचे मत
अजिंक्य रहाणेने पुन्हा जिंकली करोडो भारतीयांची मने ! बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सोपवली टी नटराजनच्या हाती