दोन वर्षानंतर भारताच्या देशांतर्गत रणजी स्पर्धेचा हंगाम सुरू होत आहे. १० फेब्रुवारीपासून रणजी करंडक स्पर्धा सुरु होत असून या स्पर्धेचे बीसीसीआयने दोन टप्प्यात आयोजन करण्याचा विचार केला आहे. कारण आयपीएल २०२२ मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे राहिलेले सामने आयपीएलनंतर खेळवले जाणार आहेत. त्यासाठी सर्व राज्यांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई देखील त्यापैकीच एक आहे.
सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवड समिती लवकरच संघाची घोषणा करणार आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचे कर्णधारपद फलंदाज पृथ्वी शॉ याच्याकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला त्याच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे.
एका संकेतस्थळच्या माहितीनुसार, पृथ्वी शॉला कर्णधारपद देण्याचा निर्णय निवड समिती, प्रशिक्षक अमोल मजुमदार आणि संघाने सोबत मिळून रहाणेशी संवाद साधूनच घेतला आहे.
रहाणे विराट कोहली कर्णधार असताना उपकर्णधार म्हणून खेळला आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत ६ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्याने कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत कर्णधारपद सांभाळले होते आणि संघाला विजय मिळवून दिला होता. त्याचा रेकॉर्ड पाहता रहाणेने ८२ कसोटी सामन्यात ४९३१ धावा, ९० एकदिवसीय सामन्यात २९६२ आणि २० टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३७५ धावा केल्या आहेत
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, रहाणे संघासोबत एक मार्गदर्शक म्हणून खेळण्यास तयार आहे. तो म्हणाला, “रहाणेसारख्या खेळाडूसाठी कर्णधारपद महत्त्वाचे नाही. कर्णधार म्हणून जे साध्य करणे अशक्य आहे ते त्याने साध्य केले आहे. संघासोबत मार्गदर्शक म्हणून खेळण्यासाठी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे नाव परत मिळवण्यासाठी तो तयार आहे. त्याला नव्या कर्णधाराबाबत कोणत्याही प्रकारची समस्या नाही. त्याला शॉची कोणतीही अडचण नाही.”
डिसेंबर २०२१ मध्ये जेव्हा संघाची निवड करण्यात आली तेव्हा शॉला कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला होता, कारण रहाणेच्या उपस्थितीबाबत काही स्पष्ट नव्हते. रहाणे त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत होता आणि १३ जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार होती. पण कोरोनामुळे ती पुढे ढकलावी लागली. सध्या रणजीसाठी रहाणे उपस्थित आहे आणि त्यामुळे मुंबई क्रिकेटच्या थिंक टँकने सर्व संबंधितांशी बोलून शॉला कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय योग्य असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
कायरन पोलार्ड स्लेज करत सूर्यकुमारला काय म्हणाला होता? स्वतः सूर्यकुमारने केला खुलासा
पहिल्या २ कसोटीत १२वा खेळाडू म्हणून खेळवले, पुढे संधी मिळताच ठोकले लागोपाठ ३ शतक