भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला एक उत्कृष्ट गोलंदाजाबरोबरच खालच्या फळीतील उत्तम फलंदाजदेखील म्हटले जात होते. त्याच्या नावावर वनडेत सर्वात वेगवान ५० विकेट्स घेण्याचा विक्रम होता. तर फलंदाजीमध्ये त्याच्या नावावर वनडेमध्ये ३ अर्धशतकांचाही समावेश होता.
तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एक शतकदेखील ठोकले आहे. हे शतक त्याने ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळताना केले होते. तसेच स्टेडिअमच्या सन्मान बोर्डावर आपले नाव कोरले होते. आगरकरने त्या सामन्यात १०९ धावांची नाबाद शतकी खेळी केली होती.
आगरकरला (Ajit Agarkar) सुरुवातीला एक फलंदाज बनायचे होते. तसेच खूप कमी लोकांना माहिती असेल की, कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आगरकरला मुंबईचा पुढील सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हटले जात होते. आपल्याला सचिन का म्हटले जात होते याबद्दल ४२ वर्षीय आगरकरने आपला माजी संघसहकारी आकाश चोपडाबरोबर ‘आकाशवाणी’ कार्यक्रमात सांगितले आहे.
“खरंतर सुरुवातीला मला फलंदाज बनायचे होते. विद्यालयीन दिवसांत रमाकांत सर आमच्या दोघांचेही प्रशिक्षक होते. त्यांनी माझ्यामध्ये काहीतरी पाहिले होते. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिनचे मोठे नाव होते. सचिनपूर्वी प्रवीण आमरे आणि अन्य मोठे खेळाडूही त्यांच्या प्रशिक्षणातून बाहेर पडले होते. त्यांनी चांगली कामगिरी केली होती,” असे आगरकर म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, “सुरुवातीला मी चांगल्या धावा करायचो, तेव्हा लोकांना वाटत होते की पुढचा सचिन मी बनू शकतो. जेव्हा १६ व्या वयात तुम्ही चांगले खेळता, तेव्हा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळते. परंतु तेव्हा ही राष्ट्रीय संघात पोहोचण्याची पहिली पायरी होती.”
“मी धावा करायचो, तेव्हा असा संदेश गेला होता की मुंबईकडून आणखी एक खेळाडू येत आहे. परंतु त्या वयात तुम्ही केवळ प्रगती करण्याचा विचार करत असता,” असेही आगरकर पुढे म्हणाला.
आगरकरच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सचिनने त्याला आपले ग्लोव्हज दिले होते. तो म्हणाला की, “सचिनने मला ग्लोव्हज दिले होते. आम्ही एकाच शाळेत शिकत होतो. तसेच त्याला वाटले की कोणीतरी चांगली कामगिरी करत आहे, त्यावेळी त्याने मला ग्लोव्हज दिले. मी तेव्हा त्याला खूप ओळखत नव्हतो. मी त्याच्या पॅडचा वापर केला नाही. कदाचित जर मी त्यांचा वापर केला असता, तर नक्कीच चांगला फलंदाज बनलो असतो.”
आगरकरने भारताकडून २६ कसोटी सामने, १९१ वनडे सामने आणि ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ५८, वनडेत २८८ आणि टी२०त ३ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-नेटिझन्सकडून भज्जी- युवीचा समाचार! भज्जी म्हणतोय, आम्ही तर त्याला मित्र समजत होतो
-स्वतःच्याच होम ग्राउंडवर प्रेक्षकांनी उडवली होती हुर्ये, कारण…
-विराट म्हणतो, फक्त आणि फक्त ‘याच’ व्यक्तीमुळे माझा फिटनेस झाला टाॅप