येत्या काही दिवसांत भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. ही मालिका टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीकोनातून युवा क्रिकेटपटूंसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टी-२० विश्वचषक स्पर्धेचे तिकीट मिळू शकते. सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताकडून चौथ्या क्रमांकावर कुठला फलंदाज उतरेल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपले मत मांडले आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने देखील याबाबत आपले मत मांडले आहे.
भारतीय संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी श्रेयस अय्यरसह सूर्यकुमार यादवचेही नाव शर्यतीत आहे. याविषयी बोलताना, माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाले की, “सूर्यकुमार यादव किंवा श्रेयस अय्यर या दोन्ही खेळाडूंपैकी एकाला टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघात खेळण्याची संधी मिळायला हवी. मी कुठल्या खेळाडूला संघात स्थान मिळावे याबाबत प्रतिक्रिया करू शकत नाही. कारण हे निवडकर्त्यांसाठी देखील खूप कठीण असणार आहे.” (Akash chopra says big fight in no. 4 position in t20 world cup)
तसेच ते पुढे म्हणाले की, “जर टी-२० विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मासह केएल राहुलने डावाची सुरुवात केली तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर रिषभ पंत आणि सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या असेल. त्यानंतर रवींद्र जडेजा किंवा वॉशिंग्टन सुंदर यांपैकी एक खेळाडू असू शकतो. परंतु चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.”
अय्यर आणि सूर्यकुमार यापैकी एकाची निवड करणे कठीण
तसेच तर पुढे म्हणाले की, “चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव किंवा श्रेयस अय्यर यांपैकी एकाची निवड करणे कठीण असणार आहे. निवडकर्ते श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यावर अधिक भर देऊ शकतात. कारण, सूर्यकुमार यादवपेक्षा श्रेयस अय्यरकडे आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा जास्त अनुभव आहे. तसेच तो उत्तम फलंदाजी देखील करतो. परंतु सूर्यकुमार यादवने श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत चांगली कामगिरी केली तर नक्कीच निवडकर्त्यांच्या डोक्याचा त्रास वाढणार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
विक्रमवीर अश्विन! पहिल्याच काउंटी सामन्यात केला विक्रम, गेल्या ११ वर्षांत कोणालाही नाही जमला
एका टी२०त ४ रनआऊट, भारतीय महिलांचे लाजबाव क्षेत्ररक्षण; पण खरे श्रेय द्रविडच्या खास व्यक्तीला
चोख प्रत्युत्तर! ब्रेक डान्सच्या बदल्यात ब्रेक डान्स, बांगलादेश-झिम्बाब्वे कसोटीतील लक्षवेधी प्रसंग