मुंबई । एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जेम्स नीशमने डिसेंबर 2012 मध्ये न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून नीशमने आपल्या कार्यकीर्दीत बरेच चढ उतार पाहिले आहेत. त्याला 2015 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंडच्या संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्याने निवृत्तीचा विचार केला होता. त्यानंतर त्याने स्थानिक सामन्यात दमदार कामगिरी करत राष्ट्रीय संघात पुन्हा आपले स्थान निर्माण केले. मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात संघाला सेमी फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी मोठी भूमिका त्याने बजावली होती. सध्या तो आयपीएलमध्ये किंग्स इलेवन पंजाब संघाकडून खेळण्यासाठी शुक्रवारी दुबईत दाखल झाला आहे.
6 वर्षानंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पुनरागमन करणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू जेम्स नीशम म्हणाला की, ‘तो आता अधिक समजूदार झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशामुळे त्याने या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.’ सुमारे सहा वर्षांपूर्वी दिल्ली फ्रँचायझीच्या वतीने आयपीएलमध्ये पदार्पण केले, तेव्हा आपल्या खेळाविषयी आपल्याला फारशी माहिती नव्हती हे नीशमने कबूल केले आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघात अनेक परदेशी खेळाडू आहेत आणि अशा परिस्थितीत आयपीएलच्या या हंगामात त्याला किती सामने खेळावे मिळतील याची कल्पना नीशमला नाही. शुक्रवारी दुबईला पोहोचल्यानंतर क्वारंटाइनमध्ये असलेल्या नीशमने पीटीआयला सांगितले की, ”मी बऱ्याच दिवसानंतर लीगमध्ये खेळत आहे. येथे वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू म्हणून येणे खूप आनंददायक आहे. मागील वेळी मी दिल्लीकडून खेळलो होतो तेव्हा मी तरूण आणि हुशार होतो पण मला माझ्या खेळाबद्दल फारसे माहिती नव्हते. यशस्वी होण्यासाठी कशाची गरज आहे हे मला माहित नव्हते. त्यावेळी माझ्यासाठी हे एक आव्हान होते.”
2015 मध्ये जेम्स नीशम कोलकाता नाईट रायडर्सबरोबर जोडला गेला होता, पण दुखापतीमुळे आयपीएलमध्ये तो खेळू शकला नाही. तो म्हणाले, ”या वेळी मी अधिक हुशार होऊन परत आलो आहे आणि मला अधिक माहिती आहे. मी संघातील युवा खेळाडूंना माझी माहिती देऊ शकतो. आमच्या संघाबद्दल मी आनंदित आहे, ख्रिस गेल आणि ग्लेन मॅक्सवेलच्या रूपात जगातील काही मोठी नावे आमच्याकडे आहेत आणि निश्चितच हा एक संघ आहे जो बरीच सामने आणि स्पर्धा जिंकू शकतो. ‘ हॉटेलच्या खोलीत 6 दिवस राहणे कंटाळवाणे आणि आव्हानात्मक असू शकते,” असेही निशमने सांगितले.