न्यूझीलंडचा क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेनंतर दोन्ही संघामध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यातील तिसरा सामना आज (रविवार, २५ जानेवारी) गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने यजमान संघाने जिंकले आहेत. यामध्ये भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलदांजांचा चांगलाच समाचार घेतला, मात्र भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनची फलंदाजीतील लय हरवल्याचे दिसले. त्यामुळे त्याची तिसऱ्या सामन्यातील जागेबरोबरच टी२० विश्वचषकातील जागाही धोक्यात आली आहे, असे वक्तव्य भारताचे माजी सलामीवीर फलंदाजाने केले आहे.
संजू सॅमसन भारताचा सध्या टी२०मधील प्रमुख फलंदाज-विकेटकीपर आहे. तो सलामीला फलंदाजीसाठी येतो. सॅमसनने या प्रकारात सलामीला येताना तीन शतकी खेळीही केल्या आहेत. तसेत त्याच्या फलंदाजी क्रमांकात नेहमी बदल होत राहिला असल्याचे दिसले. आधी संघ व्यवस्थापाकांनी शुबमन गिलला सलामीला फलंदाजीसाठी पाठवले होते. ज्यामुळे सॅमसनला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली होती.
टी२० मधील गिलचा फॉर्म हरवल्याने त्याला संघातून बाहेर केले गेले. टी२० विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून संघ व्यवस्थापकांनी सॅमसनवर पुन्हा एकदा सलामीला येण्याचा विश्वास दाखवला. त्यासाठी त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही संधी दिली आहे, मात्र त्याने निराशा केली. तो पहिल्या सामन्यात १० आणि दुसऱ्या सामन्यात ६ धावा करत बाद झाला. त्याच्या या सततच्या निराशाजनक कामगिरीमुळे कदाचित इशान किशन सलामीला येऊ शकतो.
भारताची सलामीची जोडी पाहिली तर सॅमसनसोबत अभिषेक शर्मा फलंदाजीसाठी येतो. अभिषेकने मागील काही टी२० मालिकांमध्ये तो सलामीचा योग्य पर्याय असल्याची झलक दाखवली आहे. तसेच त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. यामुळे आगामी टी२० विश्वचषकासाठी तो भारताचा सलामीसाठी एक महत्वाचा खेळाडू ठरला आहे, तर सॅमसन दोन्ही सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला असून भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सॅमसनला टी२० विश्वचषकात सलामीला चांगली कामगिरी करायची असेल तर त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांमध्ये समाधानकारक कामगिरी करावी. तसेच इशान किशनला सुमारे दोन वर्षानंतर भारतीय संघात स्थान मिळाल. त्याने रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या टी२० सामन्यात धमाकेदार ७६ धावा (३२ चेंडू) केल्या होत्या.
किशनला काही काळासाठी भारताच्या मुख्य करारतून मुक्त करत संघाबाहेर केले होते. तरीही त्याने हार न मानता स्थानिक स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करत संघपुनरागमन केले. त्याने झारखंडला त्यांची पहिली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्यात मदत केली. त्यामध्ये त्याने १९७च्या स्ट्राईक रेटने ५१७ धावा केल्या होत्या. याचाच फायदा म्हणून तो भारताच्या टी२० विश्वचषक संघात सामील झाला.
सॅमसन आणि किशनचा फॉर्मबाबत भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा म्हणाले, “सॅमसनने धावा केल्या तर तो संघात राहिल, मात्र तसे झाले नाही तर विशाखापट्टणम आणि तिरूअनंतपुरमच्या सामन्यात इशान किशन खेळताना दिसेल. तिलक वर्मा फिट होऊन संघात परतला तर सॅमसन आणि किशनना एकत्र संघात खेळवणे अवघड आहे.”
“ही मालिका टी२० विश्वचषकासाठी महत्वाची असून जो खेळाडू यामध्ये चांगली कामगिरी करेल त्यालाच विश्वचषकात खेळण्याची संधी मिळेल,” असेही चोप्रा पुढे म्हणाले.
किशनही टी२० विश्वचषकासाठी भारताचा प्रमुख सलामीवीर-विकेटकीपर आहे. त्याने त्याच्या कामगिरीत सातत्य ठेवले तर सॅमसनची जागा धोक्यात येण्याची शक्यता आहे. किशनला तिलक वर्मा दुखापतग्रस्त असल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी संधी मिळाली आहे.






