इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील लॉर्ड्स येथील दुसरा सामना जिंकत भारतीय क्रिकेट संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दमदार सांघिक कामगिरीच्या जोरावर विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंडला क्रिकेटच्या पंढरीत पराभुत करण्याची किमया केली. या विजयानंतर भारतीय संघ व कर्णधार विराट कोहली यांचे सातत्याने कौतुक होत आहे. आता यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड यांची भर पडली असून त्यांनी विराटचे कौतुक केले.
डोनाल्ड यांनी सांगितला विराटचा संकल्प
दक्षिण आफ्रिकेचे सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज राहिलेल्या ऍलन डोनाल्ड यांनी एका मुलाखतीत विराट कोहली व भारतीय संघाचे लॉर्ड्स कसोटी विजयानंतर अभिनंदन केले. त्याचवेळी त्यांनी विराटचा २०१५ मध्ये केलेला एक संकल्प सांगितला. डोनाल्ड म्हणाले,
“मला आठवत आहे की, २०१५ मध्ये विराट म्हणाला होता भारत कसोटीमध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ बनेल. यासाठी मला सर्वोत्तम तंदुरुस्त संघ हवा आहे. हा संघ विदेशातदेखील विजय मिळवण्यासाठी आतुर असेल.”
डोनाल्ड यांनी या मुलाखतीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचेदेखील तोंडभरून कौतुक केले. डोनाल्ड हे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रशिक्षक होते. त्यांनी चार वर्ष संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळलेले.
हेडिंग्लेमध्ये असेल पुढील सामना
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात खेळला गेलेला मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी शानदार विजयाची नोंद केली. यानंतर, आता मालिकेचा तिसरा सामना हेडिंग्ले ओव्हलच्या मैदानावर २५ ऑगस्टपासून खेळला जाईल. भारत या सामन्यांमध्ये विजय मिळवून प्रथमच इंग्लंडमध्ये एकापेक्षा जास्त कसोटी जिंकण्याचा पराक्रम करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
उन्मुक्तपाठोपाठ आणखी एका युवा अष्टपैलूने स्विकारली निवृत्ती, अमेरिकेचे करणार प्रतिनिधित्व
धोनीला पछाडत विराटने ‘तो’ दुर्लक्षित विक्रम केला आपल्या नावे
दिल्ली कॅपिटल्सने रिलीझ केलेल्या गोलंदाजाची ‘डबल लॉटरी’, धोनीच्या सीएसकेत मिळाली जागा?