---Advertisement---

क्रिकेटमधील सर्वात मस्तमौला खेळाडू, ज्यांनी भारताला दिला सौरव गांगुली नावाचा हिरा

On: मंगळवार, जुलै 21, 2020 7:19 PM
---Advertisement---

तारीख ५ ऑक्टोबर १९६९. न्यूझीलंडचा संघ भारत दौर्‍यावर होता. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना नागपुरात खेळला जात होता. पहिल्या डावात न्यूझीलंडने ३१९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने १५० धावांत ६ गडी गमावले होते. यावेळी २३ वर्षीय डाव्या हाताचा फलंदाज क्रीजवर आला. नाव अंबर रॉय.

११ धावांनी अशोक मंकडही बाद झाले. आता क्रीजवर फारुख इंजिनियर यांच्यासोबत अंबर रॉय होते. डायल हॅडलीच्या नेतृत्वातील न्यूझीलंडच्या गोलंदाजांना वाटले की, भारताचे फलंदाज संपले. फक्त न्युझीलंडचे खेळाडूच नाहीतर, प्रत्येकानेही असाच विचार केला. पण अंबर यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

अंबर यांनी शानदार पदार्पण करण्याचा विचार केला होता. असे म्हणतात की, अंबर यांनी आपल्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीचा भार घेतला नाही. संघाची फलंदाजी असेल तेव्हा अंबर पॅड बांधून झोपायचे. त्यांची पाळी आली की सहकारी खेळाडू त्यांला उठवायचे. अंबर मैदानात गेले की, कधी शून्य तर कधी शतक करून परत येत. परत आल्यावरही ते सिगारेट पेटवून अतिशय निर्विकारपणे बसत.

पण, त्या दिवशी अंबर यांनी भार घेतला. हॅडली, बॉब कॅनिस, हॅडली हॉवर्ड, विक पोलार्ड आणि ब्रायन यूल यासारख्या दिग्गजांनी जोर लावला पण अंबर यांना ते हलवू शकले नाहीत. त्या दिवशी स्थिती अशी होती की, फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले फारूख इंजिनीयर हेदेखील त्यांच्या समोर फिके वाटत होते.

शेवटी, अंबर हे ४८ धावा केल्यावर शेवटची विकेट म्हणून बाद झाले. या खेळीत १० चौकारांचा समावेश होता. लोक अंबर यांना पुढचा स्टार म्हणू लागले. हे पाहून त्यांचे काका पंकज रॉय हसले. भारतीय संघाचे सलामीवीर पंकज यांना वाटले की, पुतण्या आपला वारसा चालवेल. पण तसे झाले नाही. अंबर यांना पुढच्या तीन डावांमध्ये २, ० आणि ४ धावा करता आल्या.

पुढील मालिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध होती. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडकर्त्यांनी अंबर यांची निवड केली नाही. परंतु निवड समितीचे प्रमुख विजय मर्चंट यांचा अजूनही अंबरवर विश्वास होता. दिल्लीत मालिकेच्या तिसर्‍या कसोटीसाठी त्याने अंबर यांना परत बोलावले. यावेळी अंबर यांनी केवळ एका डावात फलंदाजी केली. ज्यामध्ये त्यांना खाते उघडता आले नाही.

अंबर यांच्या खराब कामगिरीकडे निवड समिती जास्त दुर्लक्ष करू शकत नव्हती. त्यांनी अंबर यांना ताकीद देखील दिली. परंतु अंबर अजूनही तसेच होते. मस्तमौला, ताण न घेणारे. पुढील कसोटी ईडन गार्डन्सवर झाली. अंबर स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत होते. पण तिथेही ते अयशस्वी झाले. या कसोटीत अंबर यांनी अनुक्रमे १८ आणि १९ धावा बनवल्या. ही कसोटी त्यांच्या कारकिर्दीची अंतिम कसोटी ठरली.

राष्ट्रीय संघातून बाहेर पडल्यानंतरही प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी चांगली होती. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण करणारे अंबर बंगालचे कर्णधार होते. स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमनानंतर अंबर यांनी आसामविरुद्ध १७३ धावा फटकावल्या. दोन सामन्यांनंतर त्यांनी बिहारविरुद्ध १३३ धावा केल्या. अंबर यांनी घरगुती क्रिकेटमध्ये सतत धावा केल्या पण त्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही.

१९७२ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला. डेरेक अंडरवुड, टोनी ग्रेग, बॉब कॉटॉम आणि जॅक बर्कनशॉ यांच्यासमोर अंबर यांनी पूर्व विभागासाठी ७० धावांची नाबाद खेळी केली. तर त्याचा संपूर्ण संघ १४७ धावांवर बाद झाली. इतकेच नव्हे तर मोईन-उद-दौला गोल्डकपच्या अंतिम सामन्यात कार्सन घावरी, प्रसन्ना, सलीम दुर्रानी आणि पद्माकर शिवलकर या दिग्गजांविरूद्ध स्टेट बँक ऑफ इंडियाकडून त्यांनी १२४ आणि ३७ धावा केल्या.

यानंतर १९७४ च्या रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही अंबर यांनी कर्नाटकविरुद्ध १५४ धावांची नाबाद खेळी खेळली. प्रसन्ना आणि भागवत चंद्रशेखर दोघेही कर्नाटक संघात खेळत होते.

अंबर यांनी आपल्या प्रथमश्रेणी कारकीर्दीतील १३२ सामन्यात ४३.१५ च्या सरासरीने ७,१६३ धावा केल्या. यात १८ शतके होती. फक्त रणजी ट्रॉफीविषयी विचार केला तर, अंबर यांनी ४९.५७ च्या सरासरीने ११ शतकांसह ३,८१७ धावा केल्या आहेत.

निवृत्तीनंतर अंबर बंगालचे निवडकर्ता झाले. अंबर हे बंगालचे १५ वर्षे निवडकर्ता होते. असे म्हणतात की, त्यांनीच सर्वप्रथम प्रथम सौरव गांगुलीची प्रतिभा ओळखली. १९८४ ते १९८६ पर्यंत ते भारतीय संघाचे निवडकर्ते ही होते. ५ जून १९४५ रोजी जन्मलेल्या अंबर यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी १९ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले. विस्डेनच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मृत्यू मलेरियामुळे झाला पण बर्‍याच जणांचा असा विश्वास आहे की त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

अंबर रॉय यांनी गंभीरतेने क्रिकेट खेळले असते तर ते सुनील गावसकर यांच्या खांद्याला खांदा लावुन भारतीय संघात खेळले असते.

वाचनीय लेख –

शतकाचा आनंदच इतका झाला की चक्क मैदानावरील पंचांनाच मारली होती धडक; सोशल मीडियावर पडला मिम्सचा पाऊस

प्रेक्षकांचा आवडता ऑस्ट्रेलियन खेळाडू दारुमुळे संपला

गोष्ट कशाचीही फिकीर न करता मनमर्जी करणाऱ्या एका क्रिकेट प्रशासकाची

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---