हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. टीम इंडियानं रविवारी (4 ऑगस्ट) उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करून अंतिम 4 मध्ये स्थान मिळवलं. हा सामना खूपच रोमांचक होता. निर्धारित वेळेत 1-1 ने बरोबरी राहिल्यानंतर भारतीय संघानं ब्रिटनचा पेनॉल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मात्र आता हा सामना वादात सापडला आहे. पहिला सर्वात मोठा वाद म्हणजे, सामन्याचा 16 व्या मिनिटाला डिफेंडर अमित रोहिदासला रेड कार्ड मिळालं, ज्यामुळे तो बाहेर झाला. यानंतर भारतीय संघ 44 मिनिटं केवळ 10 खेळाडूंसह खेळला. अमितला रेड कार्ड देण्याचा पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचं बोललं जात आहे. चाहते सोशल मीडियावर याविरोधात आवाज उठवत आहेत.
आता हॉकी इंडियानं देखील याप्रकरणी अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे. हॉकी इंडियानं आपल्या तक्रारीत म्हटलं, “पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील अंपायरिंग आणि निर्णयांच्या गुणवत्तेबाबत हॉकी इंडियानं अधिकृतपणे चिंता व्यक्त केली आहे. तक्रार भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील महत्त्वाच्या सामन्याबाबत आहे, ज्यामध्ये अंपायरिंगमध्ये विसंगती होती. यामुळे सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो.”
हॉकी इंडियाच्या तक्रारीतील तीन मुद्दे
(1) व्हिडिओ अंपायरनं विसंगत रिव्ह्यू घेतला. विशेषत: भारतीय खेळाडूबाबत, ज्याला रेड कार्ड दाखविण्यात आलं. यामुळे व्हिडिओ रिव्ह्यू सिस्टमवरील विश्वास कमी झाला आहे.
(1) शूट-आऊट दरम्यान एका गोल पोस्टच्या मागे गोलकीपरचा कोच उभा होता.
(3) शूट-आउट दरम्यान गोलकीपरनं व्हिडिओ टॅब्लेट वापरला.
सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये रेड कार्डचा वाद झाला. डिफेंडर अमित रोहिदासची स्टिक ब्रिटनच्या विल कॅलनच्या चेहऱ्यावर लागली. अमितनं हे जाणूनबुजून केलं, असं जर्मन व्हिडिओ अंपायरला वाटलं. यानंतर व्हिडीओ अंपायरच्या सल्ल्यानुसार मैदानावरील पंचांनी अमितला रेड कार्ड दाखवलं. मात्र अमितनं हे जाणूनबुजून केलं नसल्याचा दावा भारतीय खेळाडूंनी केला. व्हिडिओ अंपायरनं यल्लो कार्ड दिलं असतं तर ते अधिक योग्य ठरलं असतं, असं अनेकांचं मत आहे.
अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाल्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. अशा स्थितीत तो आता उपांत्य फेरीचा सामना खेळू शकणार नाही. उपांत्य फेरीत भारतापुढे बलाढ्य जर्मनीचं आव्हान असेल. अमित संघाचा उत्कृष्ट डिफेंडर आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाची बचावफळी कमकुवत होऊ शकतो.
हेही वाचा –
ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात रोमहर्षक शर्यत, अवघ्या 0.005 सेकंदांच्या फरकानं ठरला जगातील सर्वात वेगवान व्यक्ती!
खेळाडू टी-शर्ट काढून नाचले, समालोचकांना अश्रू आवरेना! भारताच्या ऐतिहासिक विजयानंतरचं सेलिब्रेशन
इतिहास घडला! भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री, पेनल्टी शूटआऊटमध्ये मिळवला शानदार विजय