जागतिक क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक आश्चर्यकारक विक्रम झाले आहेत, ज्यांचा पूर्वी कोणी विचारही केला नव्हता. एकदा हे विक्रम बनले की ते भविष्यात कधी तुटतील, अशी शक्यता खूप कमी असते. आतापर्यंत क्रिकेट जगतावर भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या देशांचे वर्चस्व राहिले आहे. त्यातच टी-20 (T20) फॉरमॅट आल्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या देशांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. अशा या क्रिकेट जगतात भारतीय संघाच्या नावावर एक असा अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे, जो मोडणे कोणत्याही संघासाठी जवळपास अशक्य आहे. टीम इंडियाचा हा अद्भुत रेकॉर्ड वर्ल्ड कपच्या इतिहासाशी जोडलेला आहे.
जेव्हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटची सुरुवात झाली, तेव्हा 1975 चा पहिला वर्ल्ड कप 60 षटकांचा खेळवला गेला होता. त्यानंतर 1979 आणि 1983 चे वनडे वर्ल्ड कप देखील 60 षटकांच्या
फॉरमॅटमध्येच झाले होते. यातले पहिले दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजने जिंकले. मात्र, 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून इतिहास रचला आणि भारताचे पहिले वर्ल्ड कप विजेतेपद मिळवले.
त्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये बदल करण्यात आला आणि सामने 50-50 षटकांचे खेळवले जाऊ लागले. पुढे 2007 मध्ये क्रिकेटचे आणखी छोटे रूप म्हणजेच पहिला ‘टी-20 वर्ल्ड कप’ खेळवला गेला. महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून या पहिल्याच टी-20 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.
साल 2011 मध्ये एमएस धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेला हरवून 28 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आपला दुसरा वनडे वर्ल्ड कप जिंकला. या विजेतेपदासोबतच टीम इंडियाच्या नावावर एका महाविक्रमाची नोंद झाली. तो ऐतिहासिक विक्रम म्हणजे, जागतिक क्रिकेटमध्ये भारत हा एकमेव असा संघ आहे, ज्याने क्रिकेटच्या तीन वेगवेगळ्या ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये म्हणजेच 60 षटके (1983), 20 षटके (2007) आणि 50 षटके (2011) चा वर्ल्ड कप जिंकला आहे.
हा विक्रम मोडणे आता कोणत्याही संघाला शक्य नाही, कारण आता 60 षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जात नाहीत. त्यामुळे नवीन संघांना हा पराक्रम करता येणार नाही. या विक्रमाची बरोबरी करण्याची एकमेव संधी सध्या फक्त वेस्ट इंडिज संघाकडे आहे. वेस्ट इंडिजने 60 षटकांचे २ वर्ल्ड कप जिंकले आहेत आणि टी-20 वर्ल्ड कपही जिंकला आहे. मात्र, वेस्ट इंडिजला अजूनही 50 षटकांचा (वनडे) वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी भारताचा हा त्रिसुत्री मुकुट जगात सर्वात युनिक आहे.






