२७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होत आहे. जवळपास अडीच महिन्याच्या या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहेत. पण नेहमीप्रमाणे दौऱ्यातील सामन्यांना सुरुवात होण्याआधी आजी-माजी क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक वार सुरु झाले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनल्ड यांनी वनडे मालिका सुरु होण्याआधी भारतीय गोलंदाजांना एक चेतावणी दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ न्यूझीलंडच्या निल वॅगनरने टाकलेल्या बाउंसरमुळे त्रस्त झाला होता. तसेच तो जोफ्रा आर्चरने टाकलेल्या शार्ट चेंडूवरही संघर्ष करताना दिसला होता. आता भारतीय संघातील गोलंदाजही स्मिथविरुद्ध शॉर्ट लेंथचे चेंडू टाकण्याची योजना आखू शकतात. पण मॅकडोनल्ड यांनी म्हटले आहे की स्मिथ त्यावर मात करेल. सातत्याने स्मिथवर बाउंसरचा मारा करण्याची योजना चुकू शकते.
स्मिथच्या फलंदाजीमध्ये कोणतीही कमजोरी दिसून येत नाही – मॅकडोनल्ड
मॅकडोनल्ड म्हणाले की स्मिथच्या फलंदाजीमध्ये कोणतीही कमजोरी दिसून येत नाही. ते म्हणाले, ‘मला माहित आहे की कसोटी सामन्यात आर्चरचा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला होता. पण त्यानंतर तो धावा करण्यात यशस्वीही झाला होता. वनडे आणि टी20 मध्येही त्याच्या विरुद्ध ही योजना वापरण्यात आली. पण तो धावा करण्यात यशस्वी झाला. म्हणूनच ही त्याची कमजोरी समजणार नाही. जर भारतीय गोलंदाजांना ही योजना राबवायची असेल तर ते राबवू शकतात.’
भारताची योजना स्मिथने ठरवली होती निष्फळ
यावर्षी जानेवारीमध्ये 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत स्मिथच्या विरुद्ध भारतीय संघाने शॉर्ट लेंथचे चेंडू टाकण्याची योजना वापरली होती. पण स्मिथने तेव्हा 98 आणि 131 धावांची खेळी केली होती.
मॅकडोनल्ड म्हणाले, ‘त्याने या योजनेवर काम केले आहे. ही योजना धावांना रोखण्यात आणि त्याला बाद करण्याची चांगली संधी देते. पण भारताविरुद्ध मागच्या मालिकेत तो या आव्हानाला सहज पार करुन गेला होता. मला वाटते येणाऱ्या मालिकेतही असेच होईल.’
स्मिथचा भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे, टी20 आणि कसोटी अशा तिन्ही मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघात समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ होणार अधिक रोमांचक, एका संघात खेळणार पाच विदेशी खेळाडू?
‘तो संघाचा सर्वोत्तम आणि विश्वासू फलंदाज’, वेस्ट इंडिजच्या दिग्गजाकडून सूर्यकुमारची प्रशंसा
क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! एकाच दिवशी ६ संघ खेळणार क्रिकेट, रंगणार ३ आंतरराष्ट्रीय सामने