भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. माजी क्रिकेटपटू आणि जाणकार या मालिकेविषयी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. झिम्बाब्वेचे माजी कर्णधार व इंग्लंडचे माजी प्रशिक्षक ऍन्डी फ्लॉवर यांनी इंग्लंडच्या संघाला धोक्याची सूचना दिली आहे. भारतीय संघाला मायदेशात हरवणे इंग्लंडसाठी कठीण जाणार असल्याचे फ्लॉवर यांनी म्हटले आहे.
पुढील महिन्यात सुरू होईल इंग्लंडचा भारत दौरा
भारतीय क्रिकेट संघाची नव्या वर्षातील मायदेशातील पहिली कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे सुरू होत आहे. बंद दाराआड खेळवली जाणारी ही मालिका कमालीची अटीतटीची होऊ शकते. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात तर इंग्लंडने श्रीलंकेत कसोटी मालिका विजय साजरा केला आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष या मालिकेकडे लागलेले दिसून येते. दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू असल्याने खेळाडू तसेच प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारताला पराभूत करणे कठीण- ऍन्डी फ्लॉवर
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फ्लॉवर म्हणाले, “भारताला भारतात हरवणे इंग्लंडसाठी अवघड जाईल. सध्या हा संघ वेगळ्या दर्जाचा वाटतोय. ऑस्ट्रेलिया जाऊन विजय मिळवणे कधीही प्रेरणादायी असते. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला २०१२ दौऱ्यावेळी ऍलिस्टर कूकने केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. तो एका बाजूने उभा राहिला तरी इतर खेळाडू मोठी धावसंख्या उभारून शकतात. जोस बटलर व बेन स्टोक्स यांना मधल्या फळीत येऊन केविन पीटरसनने त्यावेळी दाखवलेला खेळ करण्याची संधी मिळू शकते.”
फेब्रुवारीत सुरू होणार बहुचर्चित मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पाच फेब्रुवारीपासून चेन्नई येथे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिले दोन सामने चेन्नई येथे झाल्यानंतर उर्वरित दोन सामने अहमदाबाद येथे खेळविले जातील. त्यानंतर टी२० मालिका व वनडे मालिका पार पडतील. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली कसोटी मालिकेपासून भारतीय संघात पुनरागमन करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
कमालीच्या फॉर्ममध्ये आहे हा इंग्लंडचा खेळाडू; भारतीय संघासाठी ठरु शकतो सर्वात धोकादायक
लवकरच पाहायला मिळणार कपिल देव यांच्या ८३’ सिनेमाचा थरार, ‘या’ दिवशी होणार रिलीज?
शिखर धवन चढणार कोर्टाची पायरी, ‘या’ प्रकरणात झाला गुन्हा दाखल