भारताचा १९ वर्षाखालील संघ (u19 team india) सध्या चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. वेस्ट इंडीजमध्ये खेळला जात असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात (u19 world cup 2022) भारताने शनिवारी अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले. या सामन्यात भारतीय संघासमोर यूगांडा संघाचे आव्हान होते. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने अंगकृष रघुवंशी (angkrish raghuwanshi) आणि राज बावा (raj bawa) यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर ५० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर ४०५ धावा ठोकल्या. १९ वर्षाखालील विश्वचषकात भारतीय संघाने केलेली दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे.
भारतीय संघाने यापूर्वी २००४ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषकात ४२५ धावा केल्या होत्या. दरम्यान, शनिवारच्या सामन्यात यूगांडाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडूंना मात्र त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. सलामीवीर हरनूर सिंग १५ धावा करून स्वस्तात बाद झाला, पण अंगकृष रघुवंशीने खूपच अप्रतिम प्रदर्शन केले. हरनूर सिंग पाठोपाठ कर्णधार निशांत सिंधू देखील १५ धावांवर विकेट गमावून बसला.
कर्णधार तंबूत परल्यानंतर राजा बावा खेळपट्टीवर आला आणि अंगकृषसोबत मोठी भागिदारी केली. अंगकृषची आयर्लंडविरुद्धच्या मागच्या सामन्यात शतक करण्याची संधी थोडक्यात हुकली होती, आता या सामन्यात तो १५० धावांपासून धोड्या अंतरावर असताना बाद झाला. अंगकृषने १२० चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये २२ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १४४ धावा केल्या. अंगकृष आणि राज बावा यांनी या सामन्यात द्विशतकी भागिदारी केली.
राजा बावाची विक्रमी खेळी
अंगकृष बाद झाल्यानंतर बावाने डाव सांभाळला आणि वेगाने धावा करू लागला. त्याने यूगांडाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अवघ्या ६९ चेंडूत त्याने स्वतःचे शतक पूर्ण केले, तर १०२ चेंडूत १५० धावांचा टप्पा गाठला. या सामन्यात त्याने एकून १०८ चेंडू खेळले आणि यामध्ये १४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १६२ धावा केल्या.
राज बावाने या सामन्यात केलेल्या या तुफान खेळीमुळे एक खास विक्रमही नावावर केला. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत बावा सर्वाधिक धावांची खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताच्या मुख्य संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या नावावर होता. धवनने १७ वर्षांपूर्वी २००४ मध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात १५५ धावांची खेळी केली होती. दरम्यान बावाची एक खास ओळख अशीही आहे की, तो सुखविंदर सिंग बावा यांचा मुलगा आहे, जे माजी अष्टपैलू युवराज सिंगचे प्रशिक्षक होते.
महत्वाच्या बातम्या –
प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा असणार खास आकर्षण; हरियाणा सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय
तमिल थलाईवाजने केला सहावा सामना टाय! जयपूरसाठी नितीन रावलची निर्णायक रेड
हाराकिरीनंतरही पलटन विजय मिळवण्यात यशस्वी! मोहित गोयतचा अष्टपैलू खेळ
व्हिडिओ पाहा –