गोवा। हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमातील बाद फेरीची चुरस लढतीगणिक शिगेला जात आहे. एफसी गोवा संघाने शनिवारी चेन्नईयीन एफसीला 2-2 असे बरोबरी रोखले. बदली स्ट्रायकर इशान पंडिता याने भरपाई वेळेत सनसनाटी गोल केल्यामुळे गोव्याला एका गुणाची कमाई करता आली. गोवा गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतरास 1-1 अशी बरोबरी होती. चेन्नईयीनचे खाते आघाडी फळीतील स्लोव्हाकियाचा 32 वर्षीय खेळाडू जेकब सिल्व्हेस्टर याने उघडले. गोव्याने सहा मिनिटांत बरोबरी साधली. आघाडी फळीतील स्पेनच्या 37 वर्षीय ईगोर अँग्युलोने पेनल्टी सत्कारणी लावली. दुसऱ्या सत्रात चेन्नईयीनला मध्य फळीतील मिझोरामचा 23 वर्षीय खेळाडू लालियनझुला छांगटे याने आघाडी मिळवून दिली. गोव्याला दिल्लीचा 22 वर्षीय खेळाडू इशान पंडिता याने बरोबरी साधून दिली. इशानचा हा मोसमातील चौथा गोल आहे. प्रत्येक वेळी त्याने अंतिम क्षणी संघाला तारले आहे.
गोव्याने 17 सामन्यांत नववी बरोबरी साधली असून पाच विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 24 गुण झाले. त्यांनी हैदराबाद एफसीला गुणांवर गाठले आणि सरस गोलफरकावर मागे टाकले. गोव्याचा गोलफरक 5 (26-21), तर हैदराबादचा 4 (21-17) असा आहे. त्यामुळे हैदराबादची एक क्रमांकाने घसरण झाली.
चेन्नईयीनने 18 सामन्यांत नववी बरोबरी साधली असून तीन विजय व सहा पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 18 गुण झाले. त्यांचा आठवा क्रमांक कायम राहिला.
मुंबई सिटी एफसीने 34 गुणांसह आघाडी घेतली असून एटीके मोहन बागान 33 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांचे बाद फेरीतील स्थान नक्की झाले आहे.
खाते उघडण्याची शर्यत चेन्नईयीनने जिंकली. 13व्या मिनिटाला चेन्नईयीनचा बचावपटू रिगन सिंग याने गोव्याच्या खेळाडूंचे दडपण असूनही उजवीकडून आगेकूच केली. त्याने दिलेल्या पासवर सिल्व्हेस्टरने लक्ष्य साधले. गोलक्षेत्रातून त्याने टायमिंग साधत मारलेला फटका गोव्याचा गोलरक्षक धीरज सिंग याला अडविता आला नाही. रिगनने दिलेला पास रोखण्यात गोव्याचा बचावपटू आदील खान याला रोखता आला नाही.
गोव्याचा मध्यरक्षक रोमारीओ जेसुराज याने 17व्या मिनिटाला उजवीकडून क्रॉस शॉट मारला. त्यावर अँग्युलोने नेटच्या दिशेने हेडिंग केले, पण चेन्नईयीनचा बचावपटू एली साबिया याने चेंडू चुकून हाताने अडविला. त्यामुळे रेफरी क्रीस्टल जॉन यांनी गोव्याला पेनल्टी बहाल केली. अँग्युलोनेच ही पेनल्टी घेतली. सुरवातीला तो फटका मारत असताना दोन्ही संघांचे काही खेळाडू आधीच धावले. त्यामुळे हा गोल नाकारण्यात आला. अँग्युलोने दुसऱ्या वेळी दडपण न घेता अँग्युलोने अचूक टायमिंगसह गोल केला.
60व्या मिनिटाला सिल्व्हेस्टरने पेनल्टी क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. त्याने आघाडी फळीतील रहीम अली याला पास दिला. त्यावेळी प्रतिस्पर्ध्याचे दडपण आल्यामुळे रिगनकडे चेंडू मारणे त्याला भाग पडले. रिगनने गोलक्षेत्रात मारलेला चेंडू गोव्याचा बदली बचावपटू महंमद अली याला रोखता आला नाही. त्याचवेळी गोलरक्षक धीरज पुढे सरसावला. या दोघांची धडक थोडक्यात टळली. या संधीचा फायदा उठवित छांगटेने चेंडूवर ताबा मिळवित गोल केला.
भरपाई वेळेत मध्य फळीतील अल्बर्टो नोग्युरा याच्या पासवर इशानने अफलातून गोल केला. इशानने प्रतिस्पर्धी बचावपटूंना चकवित वेगाने घोडदौड केली आणि नेटच्या डाव्या कोपऱ्यात चेंडू मारला.
महत्त्वाच्या बातम्या –
ऐतिहासिक! सोशल मीडियावर ५०० मिलियन फॉलोअर्स असणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील पहिलाच खेळाडू
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून बेंगळुरू पराभूत
आयएसएल २०२०-२१ : सहा गोलांच्या थरारात मुंबई सिटी-गोवा बरोबरी