---Advertisement---

अपने दादा को भूले तो नहीं ते बीसीसीआयचे अध्यक्षपद- एक थक्क करणारा प्रवास

On: बुधवार, ऑक्टोबर 23, 2019 8:13 PM
---Advertisement---

आज(23 ऑक्टोबर) बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटचा दादा अशी ओळख मिळवलेल्या गांगुलीचा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. यामध्ये अनेक चढउतार आले.

क्रिकेटचा श्रीगणेशा

1989-90 ला प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केलेल्या गांगुलीने पहिल्यांदा जानेवारी 1992 ला वेस्ट इंडीज विरुद्ध भारताकडून वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र पदार्पणाच्या सामन्यात त्याला केवळ 3 धावाच करता आल्या.

या एका सामन्यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा भारताच्या संघात स्थान मिळवण्यासाठी तब्बल 4 वर्षे वाट पहावी लागली. पण त्यानेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली चांगली कामगिरी सुरु ठेवली. त्याने 1993-94 च्या रणजी ट्रॉफीमध्ये 8 सामन्यात 722 धावा केल्या.

कमकॅब किंग-

अखेर त्याने 1996 ला भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय वनडे आणि कसोटी संघात स्थान मिळवले. विशेष म्हणजे याच दौऱ्यात त्याने कसोटीमध्येही पदार्पण केले. त्याने लॉर्ड्सच्या मैदानात कसोटी पदार्पण करताना पहिल्या डावातच 131 धावांची शतकी खेळी केली.

त्यानंतर त्याने नॉटिंगघममध्ये झालेल्या पुढील सामन्यातही पहिल्या डावात 136 धावांची शतकी खेळी केली. या खेळींनी त्याला भारतीय क्रिकेटमध्ये ओळख निर्माण करुन दिली.

नेतृत्वाची धुरा-

यानंतर तो भारतीय संघातील नियमित सदस्य बनला. पुढे 2000मध्ये भारतीय क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या विळख्यात अडकला असतानाच गांगुलीकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले. गांगुलीनेही हे कर्णधारपदाचे काटेरी मुकुट समर्थपणे सांभाळताना भारताला मोठे विजय मिळवून दिले.

त्याच्या नेतृत्वाखाली सुरुवातीलाच भारताने ऑस्ट्रेलियाचा सलग 16 कसोटी सामने जिंकण्याचा विजयरथ थांबवला. त्याच्याच नेतृत्वाखाली कोलकताच्या इडन गार्डनवर स्टिव्ह वॉच्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने फॉलोऑन दिल्यानंतरही त्यांना पराभूत करण्याचा कारनामा भारताच्या शिलेदारांनी केला.

भारतीयांना कधीही न विसरता येणरा क्षण दिला-

एव्हढेच नाही तर पुढे 2002 मध्ये इंग्लंडमध्ये जाऊन नेटवेस्ट सिरिजच्या अंतिम सामन्यात लॉर्ड्सवर यजमान इंग्लंडलाच पराभूत करत विजेतेपद मिळवण्याचा बहुमानही भारताला गांगुलीच्या नेतृत्वाखाली मिळाला.

त्यावेळी त्या अंतिम सामन्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभे राहुन अंगातील जर्सी काढून ती फिरवलेला गांगुली सर्वांच्याच लक्षात राहिला.

त्यानंतर 2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करत गांगुलीच्या नेतृत्वाने शिखर गाठले. पण त्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मात्र भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. त्या विश्वचषकात गांगुलीने 465 धावा कुटल्या होत्या. तो त्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरनंतरचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील सांघिक कामगिरीचे फळ-

गांगुलीच्या कर्णधार पदाच्या कारकिर्दीत नेहमीच दुर्लक्षित राहते ती 2002 ची चॅम्पियन्स ट्रॉफी. या स्पर्धेतही भारताने अंतिम सामन्यात धडक मारली होती. मात्र भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय आल्याने अखेर दोन्ही संघांना विभागून विजेतेपद देण्यात आले होते.

गांगुलीच्या कर्णधार म्हणून या मोठ्या यशामध्ये जेवढा त्याच्या नेतृत्वगुणांचा वाटा आहे तेवढाच त्याने शोधून परखून घेतलेल्या सेहवाग, जहिर, कैफ, युवराज, गंभीर, धोनी, हरभजन अशा अनेक त्यावेळीच्या युवा क्रिकेटपटूंचाही आहे. गांगुलीने या शिलेदारांचा परखून त्यांना योग्य संधी देत क्रिकेटची एक पिढी घडवली. त्याला साथ द्यायला सचिन, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे हे खेळाडू होतेच.

195 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे नेतृत्व केलेल्या गांगुलीने सप्टेंबर 2005 ला झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा कर्णधार म्हणून शेवटचा कसोटी सामना खेळला.

अखेर तोही क्षण आलाच-

गांगुलीच्या कारकिर्दीतील 1996 – 2005 हा कालावधी आणि त्यानंतरचा कालावधी यात मोठे अंतर होते. 2005 नंतर गांगुलीने भारतीय संघातील स्थान गमावले. त्याने सप्टेंबर 2005 ते जानेवारी 2007 मध्ये भारताकडून एकही वनडे सामना खेळला नाही.

त्याच दरम्यान त्याच्यातील आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यातील वादही समोर आले होते. त्याचात परिणाम म्हणून त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते.

या दरम्यान गांगुलीची एक जाहिरात देखील आली होती. यामध्ये तो ‘मेरा नाम सौरव गांगुली हैं. भूले तो नहीं ना’ असे म्हणताना दिसला होता. तसेच याच जाहिरातीत तो हे देखील म्हणाला होता संघात परत येण्यासाठी मी शांत बसणार नाही.

त्याने जाहिरातीत म्हणल्याप्रमाणे खऱ्या आयुष्यातही करुन दाखवले. गांगुलीचे 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन झाले. त्याने वनडेमध्ये नागपूरला वेस्ट इंडिज विरुद्ध पुनरागमन करताना 98 धावांची खेळी केली. पण या यशस्वी पुनरागमनानंतर 1 वर्षाने गांगुलीने नोव्हेंबर 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कारकिर्दीतील शेवटची मालिका खेळली. या मालिकेतील नागपूरला झालेल्या शेवटच्या सामन्यात त्यावेळीचा भारताचा कर्णधार धोनीने गांगुलीला शेवटची दोन षटके नेतृत्व करण्यासाठी दिली होती. ही गांगुलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला तसेच त्याच्यातील कर्णधाराला दिलेली मानवंदना होती.

गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती तर घेतली पण त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरु ठेवले. मात्र तो एकाच आयपीएल संघात स्थिर होऊ शकला नाही. तो कोलकता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स संघाकडून आयपीएल खेळला.

मात्र नंतर मुळातच नेतृत्वाची जाण असणाऱ्या गांगुलीने क्रिकेट प्रशासनाकडे आपला मोर्चा वळवला. तो 2014 मध्ये बंगाल क्रिकेट असोसिएशनचा सहसचिव झाला आणि 2015 मध्ये बंगाल क्रिकेटचा अध्यक्षही झाला. पुढे याचवर्षी सप्टेंबरमध्ये तो दुसऱ्यांदा बंगाल क्रिकेटच्या अध्यक्षपदी निवडून आला होता आणि आता बीसीसीआयचा अध्यक्षपदीही तो विराजमान झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---