सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला आयपीएल 2024 च्या शेवटच्या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सनं त्याला लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध मैदानात उतरवलं. या सामन्यात त्यानं दोन षटक पूर्ण गोलंदाजी केली. मात्र निकोलस पूरननं त्याच्या तिसऱ्या षटकातील दोन चेंडूंवर लागोपाठ दोन षटकार मारल्यानंतर तो षटक पूर्ण न करताच मैदानाबाहेर पडला. आता यामागचं कारण समोर आलं आहे.
24 वर्षीय अर्जुन तेंडुलकरनं सामन्यातील पहिल्या दोन षटकांमध्ये शानदार कामगिरी केली. त्यानं पहिल्या दोन षटकात केवळ दहा धावा दिल्या. मात्र त्याला एकही बळी मिळाला नाही. अर्जुननं तिसरं षटक सुरू केलं आणि षटकाच्या पहिल्याच दोन चेंडूंवर लखनऊचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरननं त्याला दोन षटकार ठोकले. यानंतर अर्जुन थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला. त्यानं आपलं षटकही पूर्ण केलं नाही. लखनऊच्या 15व्या षटकात ही घटना घडली.
झालं असं की, अर्जुन तेंडुलकरला 15 व्या षटकात क्रॅम्पचा त्रास जाणवायला लागला. त्यानंतर फिजिओ मैदानात आले. तो पुढे गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागले. यानंतर हार्दिकनं त्याचं षटक पूर्ण केलं. हार्दिकच्या 4 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 17 धावा निघाल्या. या संपूर्ण षटकात 4 षटकारांसह एकूण 29 धावा झाल्या.
2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल कारकिर्दीतील हा 5 वा सामना होता. गेल्या हंगामात त्यानं 4 सामने खेळले, ज्यात त्यानं 3 विकेट घेतल्या होत्या. या हंगामात अर्जुननं 2.2 षटके टाकली, मात्र त्याला कोणतंही यश मिळालं नाही. त्याच्या षटकात 22 धावा निघाल्या.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, लखनऊनं प्रथम फलंदाजी करताना 214 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 196 धावाच करू शकला. अशाप्रकारे लखनऊनं हा सामना 18 धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑरेंज कॅपसाठी चुरशीची लढत, पर्पल कॅपवर बुमराह नाही तर ‘या’ भारतीय गोलंदाजाचा कब्जा
हार्दिक पांड्याला बीसीसीआयनं केलं निलंबित! रोहितसह मुंबई इंडियन्सच्या इतर खेळाडूंनाही दंड