कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे संपूर्ण जगाला भीती व अनिश्चिततेनी ग्रासले आहे. गेल्या वर्षी चीनच्या वुहान शहरात फ्लू म्हणून सुरू झालेल्या या विषाणूने यापूर्वीच जगभरात 3500 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.
कोरोना व्हायरसला जागतिक साथीचा रोग असे यापुर्वीच जाहिर करण्यात आले आहे. या परिस्थितीमुळे जगभरातल्या वर्षानुवर्षे सुरु असलेल्या अनेक मोठ्या स्पर्धा एकतर स्थगित करण्यात आल्या आहेत किंवा बंद दरवाजा मागे खेळवण्यात येणार आहेत. याचा अर्थ या स्पर्धांना प्रेक्षकांना हजेरी लावता येणार नाही.
बंद दरवाजा मागे खेळवण्यात येणाऱ्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेचाही समावेश आहे. 3 वनडे सामन्यांपैकी पहिला सामना आत्ता सिडनी येथे चालू आहे. ज्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 259 धावांचे लक्ष दिलेले आहे.
या मालिकेच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच म्हणाला “रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणे विचित्र गोष्ट आहे, उर्जेवर स्वार असलेल्या चाहत्यांच्या वातावरणाला तुम्ही इतके सरावलेले असता की चाहत्यांशिवाय खेळणे कंटाळवाणे होऊ शकते. खासकरुन जेव्हा तुम्ही घरी खेळत असता. ऑस्ट्रेलियन चाहते आम्हाला चांगले समर्थन देतात. हे पाहणे विचित्र आहे आणि लोकांना याचा त्रास होतो हे दुर्दैवी आहे, हे खेळासाठी अजिबात चांगले नाही”





