2025 चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. तो सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळतोय. या स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. या कामगिरीमुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.
अर्शदीप सिंगनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये 6 सामने खेळले. यामध्ये त्यानं 18.18 च्या सरासरीनं 17 विकेट्स घेतल्या. आता प्रश्न असा निर्माण होतो की, विजय हजारे ट्रॉफीतील कामगिरीमुळे अर्शदीपला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकेल का? याचं स्पष्ट उत्तर देता येत नाही. परंतु अनेक घटक अर्शदीपच्या बाजूनं असल्याचं दिसून येतं.
पहिला घटक म्हणजे विजय हजारे ट्रॉफीच्या माध्यमातून भारतीय गोलंदाजांना एकदिवसीय फॉरमॅटचा सराव मिळत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी देखील एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळली जाणार आहे. दुसरा घटक आहे मोहम्मद शमीचा. शमी दुखापतीतून सावरल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे, परंतु तो अद्याप टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकलेला नाही. जर शमी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तंदुरुस्त नसेल, तर अर्शदीपकडे संघात स्थान मिळवण्याची संधी असू शकते.
शमी व्यतिरिक्त सध्या बुमराह देखील पूर्णपणे तंदुरुस्त नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यानं गोलंदाजी केली नाही. अशाप्रकारे अर्शदीपला टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याची चांगली संधी मिळू शकते. विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्शदीपच्या शानदार गोलंदाजीचा व्हिडिओ बीसीसीआयनं शेअर केला आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, अर्शदीप टीम इंडियामध्ये टी20 स्पेशालिस्ट म्हणून खेळतो. त्यानं आतापर्यंत भारतासाठी दोन टी20 विश्वचषक खेळले आहेत. अर्शदीपनं त्याच्या कारकिर्दीत 60 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्यानं 95 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय अर्शदीपनं भारतासाठी 8 एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्यानं 12 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा –
विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये शतक, ऑस्ट्रेलियात एकाच सामन्यात मिळाली होती संधी
न्यूझीलंडच्या खेळाडूने घेतला सूर्यकुमार यादवसारखाच झेल, टी20 वर्ल्ड कपच्या आठवणी ताज्या, पाहा VIDEO
फलंदाज की गोलंदाज…क्रिकेटमध्ये कोण आहे मालामाल?