आयपीएलमधून अनेक युवा प्रतिभाशाली खेळाडू भारतीय निवडकर्त्यांच्या समोर आले आहेत. आयपीएलनंतर अनेक खेळाडूंना भारतीय संघात जागा देण्यात आल्या आहे. त्यातीलच एक युवा गोलंदाज म्हणजे अर्शदीप सिंग. अर्शदीप सिंगची भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर नेट गोलंदाज म्हणून निवड झाली आहे. याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
नेट गोलंदाज म्हणून झाली निवड
आगामी श्रीलंका दौर्यासाठी नेट गोलंदाज म्हणून निवडलेला पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग २०१९ च्या १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक विजेते प्रशिक्षक राहुल द्रविडबरोबर काम करण्यास उत्सुक आहे आणि मालिकेच्या दरम्यान त्यांना प्रभावित करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
अर्शदीपने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, “कॉल मिळणे महत्वाचे होते, मला याची अजिबात अपेक्षा नव्हती. राहुल सरांसोबत पुन्हा काम करणे केकवर चेरी असल्यासारखे आहे. राहुल सर यांच्यासोबत काम करण्याच्या माझ्या खूप आठवणी आहे. त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची मला एक अद्भुत संधी आहे. ते संघातील प्रत्येक खेळाडूशी समान वागणूक ठेवतात. श्रीलंका दौऱ्यात मी नक्कीच त्यांच्या मनावर छाप पाडण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांचे लक्ष वेधून घेईन.”
कोलंबोच्या आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा श्रीलंका विरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी -२० सामने खेळणार आहे. १३, १६ आणि १८ जुलै राजी हे एकदिवसीय सामने खेळले जातील, तर टी २० सामने २१, २३ आणि २५ जुलै रोजी खेळले जातील.
तीन वर्षांपूर्वी पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारताने न्यूझीलंडमध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. या संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड होते. विश्वचषकदरम्यान भारताच्या वेगवान गोलंदाजीच्या तिकडीमध्ये ईशान पोरेल, शिवम मावी आणि कमलेश नगरकोटी यांचा समावेश होता. पोरेल जखमी झाल्यानंतर अर्शदीपसिंगला संधी मिळाली. अर्शदीपने दोन सामन्यांत तीन गडी बाद केले आणि आपली क्षमता दर्शविली.
अर्शदीप म्हणाला, “माझ्या १९ वर्षांखालील संघातील खूप चांगल्या आठवणी आहेत. राहुल सरांनी मला १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी निवडले आणि माझ्या प्रतिभेचे कौतुक केले.”
राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यादरम्यान भारतीय संघाचा प्रशिक्षक असणार आहे.
केएल राहुलनी पाठिंबा दर्शविला
एक राहुल द्रविड होता, ज्याने अर्शदीपवर विश्वास ठेवला आणि आणखी एक राहुल ज्याने त्याला संधी दिली, तो म्हणजे केएल राहुल. युएईमध्ये आयोजित आयपीएल २०२० मध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना अर्शदीपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या संघाचे नेतृत्व केएल राहुल करतो. अर्शदीपने आपल्या कौशल्य, दृष्टीकोन आणि परिश्रमांनी कर्णधाराला प्रभावित केले होते. आपल्या प्रगतीचे श्रेय अर्शदीपने आयपीएल आणि पंजाब किंग्जला दिले आहे.
अर्शदीप म्हणाला, “आयपीएलमध्ये खेळण्यामुळे मी एक क्रिकेटपटू म्हणून उत्कृष्ट खेळाडू बनलो. जेव्हा तुम्ही केएल राहुल, ख्रिस गेल, मयांक अगरवाल, डेव्हिड मालन, निकोलस पूरण यांना नेटमध्ये गोलंदाजीस प्रारंभ करता तेव्हा तुम्हाला तुमच्या चुकांचे विश्लेषण करायला भाग पडते. महत्त्वपूर्ण षटकांत गोलंदाजीची भीती आता माझ्यात राहिली नाही आहे. मी माझ्या चुकांवर काम करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे मला आवश्यक परिणाम मिळविण्यात मदत झाली. ”
शमीकडून सुधारण्यात मदत
आयपीएलमध्ये मोहम्मद शमीबरोबर वेळ घालवल्याने त्याला गोलंदाज म्हणून मदत झाली आहे, असे अर्शदीपला वाटते. शमीचा अर्शदीपवर खूप प्रभाव आहे.
अर्शदीप म्हणाला, “आयपीएल दरम्यान शमी भाईने मला नेहमीच सांगितले आहे की वेगवान गोलंदाजासाठी परिपूर्णता गाठण्यासाठी सुधारणा आवश्यक आहे. ही एक सततची प्रक्रिया आहे आणि त्याने माझा वेग वाढवण्यासाठी काहीतरी युक्त्याही सांगितल्या. त्याने मला सांगितले कमी रनअपने गोलंदाजी करणे आणि माझ्या हाताच्या वेगावर काम करणे हे मला वेगवान होण्यास मदत करते. मी त्यावर काम केले आहे आणि श्रीलंकेतील नेट्समध्ये गोलंदाजी करतानाही या सुधारणा करेल.
स्वप्नांच्या अगदी जवळ
अनेक युवा खेळाडूंच्या शर्यतीत असल्याने अर्शदीपला राष्ट्रीय संघाकडून खेळणे सोपे नाही. पण अर्शदीपने आशा व्यक्त केली की एक दिवस तो या गर्दीतून बाहेर येईल आणि आपले स्वप्न पूर्ण करेल.
तो म्हणाला, “मी सामना खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा माझ्या बालपणीचे प्रशिक्षक जस्टवान राय नेहमी मला प्रक्रियेवर विश्वास ठेवायला सांगत असत. माझे ध्येय नेहमीच माझे १०० टक्के देणे आहे. मैदानावर आणि वरिष्ठ व कनिष्ठांकडून शिकत रहाणे. माझे अंतिम ध्येय भारताकडून खेळणे हे आहे, आणि मी माझ्या स्वप्नाजवळ एक पाऊल जवळ आहे.”
महत्वाच्या बातम्या
विश्वचषकात ‘तू चल मी आलो’चा प्रसंग, इंग्लंडच्या गोलंदाजांनी अवघ्या ४५ धावांवर गुंडाळला होता डाव
इंग्लंडवर १-०ने मात करत न्यूझीलंडचा ‘मोठा’ पराक्रम, २२ वर्षांच्या प्रतिक्षेवर लावला पूर्णविराम
ब्रॉडने निवडली त्याची ‘ऑलटाईम फेवरेट इलेव्हन’, सचिनसह त्याच्या जिगरी मित्रालाही दिली जागा