भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा नुकताच समाप्त झाला. संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात वनडे व टी२० मालिका आपल्या नावे केली. वनडे मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यात यष्टीरक्षक रिषभ पंतने नाबाद शतक झळकावत मालिका भारतीय संघाच्या पारड्यात टाकली. त्याच्या या कामगिरीनंतर अनेक दिवस त्याचे कौतुक करत आहेत. आता यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू अरुण लाल यांचीदेखील भर पडली.
रिषभची शानदार खेळी
मँचेस्टर येथील वनडे मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र, रिषभ पंतने संघाला अडचणीतून बाहेर काढताना प्रथम हार्दिक पंड्यासोबत शतकी भागीदारी रचली. हार्दिक बाद झाल्यानंतरही त्याने आपल्यावरील जबाबदारी सोडली नाही. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत १२५ धावांची खेळी साकारली. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक ठरले.
रिषभचे होतेय कौतुक
रिषभच्या शतकानंतर त्याचे जगभरातील क्रिकेट समीक्षक व चाहते कौतुक करत आहेत. भारताचे माजी कसोटीपटू अरुण लाल यांनीदेखील त्याचे गुणगान गायले. एका मुलाखतीत त्यांना रिषभ भारताचा पुढील कर्णधार होऊ शकतो का? असे विचारले असता ते म्हणाले,
“होय अगदीच. रोहितनंतर रिषभच कर्णधार पदासाठी योग्य निवड ठरेल. मला नेहमीच वाटते की कर्णधाराने पहिल्या तीन खेळाडूत आपले स्थान बनवले पाहिजे. रिषभ असाच खेळाडू आहे जो अजिबात घाबरत नाही. तो दबावाला घाबरत नाही व नेहमीच संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढे येतो. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे की, भारताकडे रिषभसारखा आक्रमक खेळाडू कर्णधार म्हणून पर्याय आहे.”
नेतृत्वाचाही आहे अनुभव
रिषभने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तसेच आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स व देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली रणजी संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. यापूर्वी देखील अनेक दिग्गजांनी त्याला भारतीय संघाचे भविष्यातील कर्णधार म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: विश्वचषक १९८३ स्पर्धेतील दुर्लक्षित नायक, ज्याने कैफ, युवराजलाही दिले होते प्रशिक्षण
युवकांना संधी, कसोटीवर लक्ष, भावूक संदेश देत बेन स्टोक्सची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
इंग्लंड दौऱ्यातील पाच पराक्रम, जे टीम इंडियाला बनवतील टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन