ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिका (ashes series) बुधवारी (८ नोव्हेंबर) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंड संघ पहिल्या दिवसाच्या शेवटी १४७ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाचा नवीन कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (pat cummins) याने पहिल्या दिवशी सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले.
कमिन्सने सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या तब्बल पाच खेळाडूंना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्याव्यतिरिक्त मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी देखील प्रत्येकी दोन विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसचे कॅमरून ग्रीनने देखील पहिल्या दिवशी एक विकेटचे योगदान दिले. अशाप्रकारे पहिल्या दिवशी इंग्लंडचे फलंदाज धावा करण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळाले.
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, जो ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. मिचेल स्टार्कने डावाच्या पहिल्या चेंडूवर सलामीवीर रोरी बर्न्सला (०) त्रिफळाचीत केले. इंग्लंड संघाची धावसंख्या ० असताना ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट मिळवली. त्यानंतर डेविड मलान अवघ्या सहा धावा करून बाद झाला, तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार जो रुटने सर्वांचीच निराशा केली. रुट त्याचे खाते न खोलताच तंबूत परतला. हेजलवूडने रुट आणि मलान यांना तंबूचा रस्ता दाखवला.
बेन स्टोक्स या पुनरागमन सामन्यात चांगली खेळी करेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण तो अवघ्या पाच धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने १३ व्या षटकात स्टोक्सची विकेट घेतली. इंग्लंड संघासाठी पहिले पाच खेळाडू अपयशी ठरल्यानंतर त्यानंतरचे खेळाडू संघाची धावसंख्या १०० च्या वर घेऊन गेले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ओली पॉपने ७९ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या. तर उपकर्णधार जॉस बटरलने सर्वाधिक ३९ धावा केल्या. या दोघांनी संघासाठी सर्वात मोठी ५२ धावांची भागीदारी रचली.
पण त्यानंतर ओली पॉप कॅमरून ग्रीनच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंड संघाने एकापाठोपाठ एक विकेट्स गमावले आणि संघ ५०.१ षटकात १४७ धावा करून सर्वबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीने शेअर केला ‘८०च्या दशकातील मुलां’चा फोटो; लिहिले, ‘एकेकाळची गोष्ट आहे…’
रोहित वनडे संघाचा कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधारपद रिक्त, ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार