क्रिकेट चाहते गेल्या काही महिन्यांपासून ऍशेस मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. या मालिकेला बुधवार पासून (८ डिसेंबर) सुरुवात झाली आहे. हा सामना ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजीला येणार इतक्यात पावसाने अडथळा घातला आणि पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे.
इंग्लंडचा डाव १४७ धावांवर आटोपला
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, इंग्लंडच्या सलामीवीरांना चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. रॉरी बर्न्स खातेही न खोलता माघारी परतला होता, तर हमिद अवघ्या २५ धावा करत माघारी परतला. कर्णधार जो रूटदेखील भोपळाही न फोडता माघारी परतला. तसेच जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तर ऑली पोपने ३५ धावांचे योगदान दिले. इंग्लंड संघाचा संपूर्ण डाव १४७ धावांवर आटोपला.
पॅट कमिन्सने रचला इतिहास
या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सला देण्यात आले आहे. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात त्याने ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. असा कारनामा करणारा तो पहिलाच ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात १३.१ षटक गोलंदाजी केली होती. ज्यामध्ये त्याने ३८ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. या दरम्यान त्याने हमीद, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, ऑली रॉबिन्सन, मार्क वूड यांना बाद केले.
अशी आहे ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११ – डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेझलवुड
अशी आहे इंग्लंड संघाची प्लेइंग ११ – रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ऑली रॉबिन्सन, मार्क वुड, जॅक लीच
महत्वाच्या बातम्या:
ड्वेन ब्रावो म्हणतोय, “भारताने मला एक ब्रँड बनवले, हा देश माझ्या हृदयाच्या खूप जवळ”
मुंबई कसोटीतील शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेत मयंक असेल राखीव पर्याय, माजी प्रशिक्षकांनी सांगितले कारण
क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ‘ऍशेस’