शनिवारी (12 ऑक्टोबर) ब्रायन लारा स्टेडीयम, तरौबा, त्रिनीदाद येथे कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये गयाना अमेझॉन वॉरियर्स विरुद्ध बार्बाडोज ट्रायडेंट यांच्यात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात बार्बाडोज ट्रायडेंटने 27 धावांनी विजय मिळवत विजेतेपदही पटकावले.
या सामन्यात वेस्ट इंडीजचा ऍश्ले नर्सने विकेट घेतल्यानंतर ‘बाबाजी का ठुल्लू’ दाखवत अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त केला. त्याचा व्हिडिओ सध्या मोठ्याप्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रत्येक गोलंदाज फलंदाजाला बाद केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे आनंद व्यक्त करत असतात. जसे की दक्षिण आफ्रिकेचा इमरान ताहिर विकेट घेताच मैदानावर धावत सुटतो. या बरोबरच विंडीजचा शेल्डन कॉटरेल आर्मी सॅल्यूट देत फलंदाजांना पवेलियनची वाट दाखवतो.
आता ऍश्ले नर्सचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये गयाना अमेझॉन वॉरियर्सच्या फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर नर्सने ‘बाबाजी का ठुल्लू’ दाखवत आनंद साजरा केल्याचे दिसत आहे. त्याची ही कृती पाहून चाहत्यांना विनोदी अभिनेता कपिल शर्माची आठवण झाली आहे.
ऍश्लेने त्याच्या अशा पद्धतीने आनंद व्यक्त करण्याचे कारण सांगितले. तो म्हणाला, ‘मी अशाप्रकारचा आनंद व्यक्त करण्यामागे एकमेव जबाबदार आहे तो म्हणजे माझा भारतीय मित्र सनी सोहेल.’
‘मी त्याच्याशी कॅरिबियन प्रिमियर लीगमध्ये भेटलो. तो मला म्हणाला होता की, ‘तू जेव्हा जेव्हा विकेट्स घेशील तेव्हा बाबाजीचा ठुल्लू दाखव.’
https://twitter.com/Hassam_gt/status/1183311925242933248
बार्बाडोज ट्रायडेंटकडून खेळताना अमेझॉन वॉरियर्स विरुद्ध नर्सने 4 षटकात 2 महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्या. त्याने विरोधी संघाचा उत्कृष्ट फलंदाज ब्रॅंडन किंग आणि निकोलस पूरन यांची विकेट घेतली. तसेच त्याने फलंदाजी करतानाही 15 चेंडूत नाबाद 19 धावांचे योगदान दिले.
कॅरिबियन प्रिमियर लीगच्या या अंतिम सामन्यात बार्बाडोज ट्रायडेंटने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीला उतरत बार्बाडोज ट्रायडेंटने 171 धावा केल्या आणि गयाना अमेझॉन वॉरियर्सला 172 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना गयाना अमेझॉन वॉरियर्सला 20 षटकात 9 बाद 144 धावाच करता आल्या.






