इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना बुधवारपासून (२५ ऑगस्ट) हेडिंग्ले मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघ दुसरी कसोटी जिंकून आघाडीवर असला तरी, हीच विजयी लय कायम राखण्याचा कर्णधार विराट कोहली व संघाचा प्रयत्न असेल. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाच्या जवळ असलेल्या फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला संधी मिळते का हे पाहणे रंजक ठरेल.
अश्विन मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर
भारताचा क्रमांक एकचा कसोटी फिरकीपटू असलेला रविचंद्रन आश्विन एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अश्विनच्या नावावर सध्या ४१३ कसोटी बळी असून त्याला पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज वसिम अक्रम व भारताचा वरिष्ठ फिरकीपटू हरभजन सिंग यांच्या पुढे जाण्याची संधी आहे. या दोघांच्या नावे अनुक्रमे ४१४ व ४१७ कसोटी बळी आहेत. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉक याच्या ४२१ बळींच्या पुढे जाण्याची संधी देखील त्याच्याकडे असेल.
संघात मिळत नाही संधी
इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या दोन कसोटीत अश्विनचा अंतिम अकरामध्ये समावेश करण्यात आला नाही. त्याच्या ऐवजी अष्टपैलू रवींद्र जडेजा ला फिरकीपटू म्हणून प्राधान्य देण्यात आले. मायदेशातील इंग्लंड विरुद्धची मालिका तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अश्विनने उत्कृष्ट कामगिरी केली होती. पहिल्या दोन्ही कसोटी त्याचा समावेश न केला गेल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जातेय. अश्विन गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
तिसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी
हेडिंग्ले येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता काहीशी कमी आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना, सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असल्याने, आपण संघात फारसे बदल करू इच्छित नाही असे म्हटले होते. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही अश्विनला बाकावर बसावे लागू शकते.
तिसऱ्या कसोटीसाठी संभावित भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व इशांत शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटी जिंकत WTC गुणतालिकेत भारताचे वर्चस्व, अव्वलस्थानी केला ताबा; इंग्लंड संघ मात्र घसरला
फलंदाजीस पोषक हेडिंग्ले मैदानावर कोहलीकडे २३००० धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी, गरज आहे फक्त…
हेडिंग्लेवर विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याची टीम इंडियाला संधी, पाहा कसा आहे आत्तापर्यंतचा रेकॉर्ड