चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा आज (१४ फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. भारताने उभारलेल्या ३२९ धावांच्या प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची अत्यंत दयनीय अवस्था झाली. इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर उरकला. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने भारतीय गोलंदाजांचे नेतृत्व करत, पाच बळी मिळवून एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.
अश्विनची दर्जेदार गोलंदाजी
अनुभवी रविचंद्रन अश्विन इंग्लंडच्या पहिल्या डावात अत्यंत दर्जेदार गोलंदाजीची सादरीकरण करत आहे. भारताने मिळवलेल्या दहा बळींपैकी पाच बळी अश्विनने आपल्या नावे केले आहेत. अश्विनने सलामीवीर डॉम सिबली, डॅन लॉरेन्स व अष्टपैलू बेन स्टोक्स यांना बाद करत इंग्लंडच्या धावसंख्येला लगाम घातला. या पाच बळींसह तो २०१५ पासून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी पोहोचला.
सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत प्रथमस्थानी पोहोचला अश्विन
अश्विनने सन २०१५ पासून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थान पटकावले आहे. अश्विनने २०१५ पासून आजपर्यंत ५३ सामने खेळताना २७७ बळी आपल्या नावे केले आहेत. अश्विनपाठोपाठ यादीमध्ये दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लायन हा आहे. लायनने या काळात ६२ कसोटी खेळताना २६५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याचा क्रमांक लागतो. त्याने ७१ सामने खेळताना २५३ फलंदाजांना बाद केले आहे. अश्विन, लायन व ब्रॉड यांच्यापाठोपाठ इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हे अनुक्रमे २३१ व २१० बळी घेत चौथ्या व पाचव्या स्थानी विराजमान आहेत.
भारतीय गोलंदाजांनी गाजवले इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व
फलंदाजांनी उभारलेल्या ३२९ धावांनंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ईशांत शर्माने पहिल्याच षटकात सलामीवीर रॉरी बर्न्स याला शून्यावर पायचीत केले. त्यानंतर दुसरा सलामीवीर डॉम सिबली व डॅन लॉरेन्स देखील झटपट बाद झाले. पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला अश्विनच्या हाती झेल देण्यास भाग पाडून भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर अश्विनने बेन स्टोक्स व मोहम्मद सिराजने ओली पोप याला बाद करून भारताला सामन्यात फ्रंटफूटवर आणले.
पुढे अश्विनने ऑली स्टोन आणि स्टुअर्ट ब्रॉडला बाद करत ५ विकेट्स पूर्ण केल्या. तर अक्षरने मोईन अलीला आणि इशांत शर्माने जॅक लीचला बाद केले. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर संपुष्टात आला आणि भारताला १९५ धावांची आघाडी मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या-
“या सामन्यात टॉस जिंकला म्हणूनच भारत मजबूत स्थितीत, अन्यथा…”, माजी इंग्लिश खेळाडूने पुन्हा डिवचले
शाब्बास अज्जू! चित्त्याच्या चपळाईने डाइव्ह मारत रहाणेने टिपला भन्नाट झेल, एकदा व्हिडिओ पाहाच
स्पायडरमॅन नाही सुपरमॅन! हवेत सूर मारत पंतने घेतला लाजवाब झेल, पाहा व्हिडिओ