दुबई। आज(25 सप्टेंबर) भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात एशिया कपचा सुपर फोरमधील सामना रंगणार आहे.
या सामन्यातून भारताला अंतिम सामना खेळण्याआधी विजयाची लय कायम ठेवण्याचे आव्हान आहे. तर अफगाणिस्तान त्यांचा या स्पर्धेतील शेवट विजय मिळवून गोड करण्याचा प्रयत्न करतील.
भारत या एशिया कपमध्ये एकही सामना पराभूत झालेला नाही. भारताने साखळी फेरीत पाकिस्तान आणि हाँगकाँगचा तर सुपर फोरमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानचाच पराभव केला आहे.
तसेच अफगाणिस्तानने साखळी फेरीत बांगलादेश आणि श्रीलंकेचा पराभव केला आहे. मात्र सुपर फोरच्या दोन्ही सामन्यात त्यांना विजयाच्या जवळ येऊनही पराभव स्विकारावा लागला आहे. त्यांना पाकिस्तान आणि बांगलादेशने सुपर फोरमध्ये शेवटच्या षटकात पराभूत केले आहे.
त्यामुळे अफगाणिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे आणि भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
यामुळे या सामन्याच्या निकालाचा स्पर्धेवर तसा मोठा परिणाम होणार नाही. पण तरीही अफगाणिस्तानने आत्तापर्यंत केलेली कामगिरी पाहता ते भारतासाठी धोकादायक ठरु शकतात. त्यांच्या गोलंदाजी आक्रमणाने सर्वांनाच प्रभावित केले आहे.
त्यांच्याकडे राशीद खान, मुजीब उर रेहमान, मोहम्मद नबी असे स्टार क्रिकेटपटू आहेत. हे भारतासाठी डोकेदुखी ठरु शकतात. पण मात्र त्यांची कमकुवत असलेली फलंदाजीवर त्यांना सुधारणा करावी लागणार आहे.
पण त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनीही सर्वच स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन मधल्या फळीला तपासण्याच्या दृष्टीने विचार करेल. तसेच कदाचीत केएल राहुल आणि मनिष पांडे यांनाही या सामन्यासाठी 11 जणांच्या संघात संधी मिळू शकते.
याबरोबरच दिपक चहरलाही कुलदीप यादव किंवा युजवेंद्र चहलच्या ऐवजी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता अफगाणिस्तानची गोलंदाजी आणि भारताची फलंदाजी यांच्यातील कोण वर्चस्व ठेवेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या सामन्यासाठी बनवण्यात आलेली खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असली तरी फिरकी गोलंदाजांनाही मदत करण्याची शक्यता आहे..
भारत आणि अफगाणिस्तान हे दोन संघ वनडेमध्ये आत्तापर्यंत फक्त एकदाच आमने सामने आले आहेत, तेही 2014 च्या एशिया कप स्पर्धेत. हा सामना भारताने 8 विकेट्सने सहज जिंकला होता.
एशिया कप 2018: सुपर फोरमधील भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याबद्दल सर्वकाही-
भारत विरुद्ध अफगाणिस्तान कधी होणार आहे सुपर फोरमधील सामना?
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सुपर फोरचा सामना 25 सप्टेंबर 2018 ला होणार आहे.
कोठे होईल भारत विरुद्ध अफगाणिस्तान सुपर फोरमधील सामना?
भारत विरुद्ध अफगाणिस्तान सुपर फोरमधील सामना दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
किती वाजता सुरु होईल भारत विरुद्ध अफगाणिस्तान सुपर फोरमधील सामना?
भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 5.00 वाजता भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील सामन्याला सुरुवात होईल. तर 4.30 वाजता नाणेफेक होईल.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 सिलेक्ट, स्टार स्पोर्ट्स 1 सिलेक्ट एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी 1 आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी 1 एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील सामना पाहता येणार आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?
hotstar.com या वेबसाईटवर भारत विरुद्ध अफगाणिस्तान सुपर फोरमधील सामना ऑनलाइन पाहता येईल.
यातून निवडला जाईल 11 जणांचा संघ:
भारत:रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, दिपक चहर, रविंद्र जडेजा.
अफगाणिस्तान: असघर अफगाण (कर्णधार), मोहम्मद शहझाद, इहसानुल्लाह जनत, जावेद अहमदी, रेहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद नबी, गुल्बादिन नायाब, रशीद खान, नजीबुल्लाह झादरान, मुजीब उर रहमान, आफताब आलम, सामीउल्लाह शेनवारी, मुनीर अहमद, सईद शिरझाद, शारफुद्दीन अशरफ, यमीन अहमदझाई.
महत्वाच्या बातम्या –
–रोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित
–म्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल
–शिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज