दुबई। संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या 14 व्या एशिया कप स्पर्धेत आज भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुपर फोर फेरीतील पहिला सामना रंगणार आहे.
6 वेळच्या विजेत्या भारतीय संघाने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकत सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे.तर बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला तर अफगाणिस्तानविरुद्ध पराभव स्विकारला आहे. त्यामुळे भारत विजयाची लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करतील.
तसेच बांगलादेशने मागील काही वर्षात भारताला चांगली लढत दिली आहे. त्यांनी याचवर्षी श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफीच्या सामन्यातही भारताला शेवटच्या चेंडूपर्यंत लढत दिली होती. या सामन्यात दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन भारताला विजय मिळवून दिला होता.
तर अशाचप्रकारे 2016 ला झालेल्या टी20 विश्वचषकातही भारताने बांगलादेशवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळीही बांगलादेश भारताला धक्का देण्याचा प्रयत्न करेल.
मात्र या सामन्याआधी भारताला 3 मोठे धक्के बसले आहेत. भारताच्या हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर या तीन क्रिकेटपटूंना दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. त्यांच्या ऐवजी रविंद्र जडेजा, दिपक चहर आणि सिद्धार्थ कौल या क्रिकेटपटूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
याबरोबरच भारताच्या संघात फलंदाजीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यात सलामीला रोहित शर्मा आणि शिखर धवन येतील. तर मधल्या फळीतील फलंदाजीसाठी मात्र स्पर्धा सुरु आहे.
त्यामुळे आता भारताच्या 11 जणांच्या संघात कोणाला जागा मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तसेच बांगलादेश संघालाही अफगाणिस्तान विरुद्ध फलंदाजांना आलेले अपयश सलत असेल. त्याचबरोबर त्यांचा फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर फलंदाज तमीम इक्बाल पहिल्याच सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने त्याची कमीही त्यांना भासत असेल.
त्याचबरोबर त्यांना कालच( 20 सप्टेंबर) झालेल्या अफगाणिस्तानच्या सामन्यानंतर लगेचच आज भारताबरोबर सामना खेळायचा आहे. त्यामुळे हा सामना खेळण्यासाठी त्यांना अबुधाबीतून पुन्हा दुबईत यावे लागणार आहे.
या वेळापत्रकाबद्दल बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्तझाने नाराजीही व्यक्त केली आहे. पण बांगलादेशने भारताविरुद्ध सुपर फोरमध्ये सामना खेळावा लागणार असल्याने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती.
त्यामुळे आता भारताविरुद्ध त्यांचा शाकिब अल हसन सारखा अष्टपैलू खेळाडू, मुस्तफिझुर रेहमान, कर्णधार मोर्तझा, मुशफिकुर रहिम यांच्याही कामगिरीकडे लक्ष असेल.
पण त्याचबरोबर बांगलादेश हे 2012 आणि 2016 च्या एशिया कपचे उपविजेते आहेत हे विसरुनही चालणार नाही.
भारत आणि बांगलादेश आत्तापर्यंत 33 वेळा वनडेत आमने सामने आले असून भारताने यात 27 वेळा बाजी मारली आहे, तर बांगलादेशने 5 वेळा विजय मिळवला आहे. तसेच 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
याबरोबरच एशिया कपस्पर्धेत हो दोन संघ आत्तापर्यंत 10 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यात भारताने 9 वेळा तर बांगलादेशने 1 वेळा विजय मिळवला आहे.
भारत आणि बांगलादेश सामन्याच्यावेळी अबुधाबीमध्ये पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुपर फोरमधील सामना रंगणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याबद्दल सर्वकाही-
भारत विरुद्ध बांगलादेश कधी होणार आहे एशिया कपमधील सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एशिया कपचा सामना 21 सप्टेंबर 2018 ला होणार आहे.
कोठे होईल भारत विरुद्ध बांगलादेश एशिया कपमधील सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश एशिया कपमधील सामना दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
किती वाजता सुरु होईल भारत विरुद्ध बांगलादेश एशिया कपमधील सामना?
भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 5.00 वाजता भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एशिया कपमधील सामन्याला सुरुवात होईल.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एशिया कपमधील सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 सिलेक्ट, स्टार स्पोर्ट्स 1 सिलेक्ट एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी 1 आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी 1 एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एशिया कपमधील सामना पाहता येणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एशिया कपमधील सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?
hotstar.com या वेबसाईटवर भारत विरुद्ध बांगलादेश एशिया कपमधील सामना ऑनलाइन पाहता येईल.
यातून निवडला जाईल 11 जणांचा संघ:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, दिपक चहर, रविंद्र जडेजा.
बांगलादेश: मशर्रफ मोर्ताझा (कर्णधार), शाकिब अल हसन, मोहम्मद मिथुन, लिटन दास, मुशफिकुर रहिम, अरिफुल हक, महमदुल्ला, मोसद्दीक हुसेन, मेहदी हसन, नाझमुल इस्लाम, रुबेल हुसेन, मुस्तफिजुर रहमान, अबू हैदर रोनी, नाझमुल हुसेन शान्तो, मोमिनुल हक.
महत्त्वाच्या बातम्या:
–राशीद खान विषयी माहित नसलेल्या काही खास गोष्टी
–युरोपा लीगसाठी चेल्सीमधून हे मोठे खेळाडू बाहेर
–धोनीच्या त्या निर्णयामुळे माझे आयुष्य बदलले- केदार जाधव
–फक्त ख्रिस गेल आणि रोहित शर्मानेच असा कारनामा केलायं