आशिया चषक 2022 चा अंतिम सामना दुबई येथे खेळला गेला. युवा श्रीलंका संघाने तगड्या पाकिस्तानला 23 धावांनी पराभूत करत सहाव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला. पाकिस्तानला या सामन्यात विजेतेपदाचा दावेदार मानले जात होते. मात्र, श्रीलंकेने त्यांना तिन्ही आघाड्यांवर पराभूत करत विजयाची माळ गळ्यात घातली. पाकिस्तानच्या या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते निराश दिसले. त्याचबरोबर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा हे देखील आपली निराशा लपवू शकले नाहीत व सामन्यानंतर एका भारतीय पत्रकारावर त्यांनी रोष व्यक्त केला.
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचे पारडे जड होते. मात्र, श्रीलंकेने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत विजेतेपद पटकावले. हा सामना पाहण्यासाठी आशियाई क्रिकेट कौन्सिलचे सर्व पदाधिकारी तसेच सर्वच क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष यांना निमंत्रण मिळाले होते. पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) हेदेखील हा सामना पाहताना दिसले. या सामन्यानंतर स्टेडियममधून बाहेर पडताना काही पत्रकारांनी त्यांना गाठले. यादरम्यान एका भारतीय पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की, “पाकिस्तानच्या पराभवानंतर लोक नाराज आहेत याविषयी काय सांगाल?” त्यावर संतप्त होत त्यांनी उलट प्रश्न केला की, “तुम्ही भारतीय आहात ना? पत्रकाराने होकारार्थी उत्तर दिल्यानंतर, राजा यांनी कोणते लोक नाराज आहेत असे विचारले. या संपूर्ण घटनेवेळी ते पाकिस्तानच्या पराभवामुळे रागावले असल्याचे स्पष्ट दिसून येत होते. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
https://www.instagram.com/reel/CiYN90ROg_6/?utm_source=ig_web_copy_link
अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. वेगवान गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत 60 धावांच्या आत श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला होता. मात्र, त्यानंतर वनिंदू हसरंगा व भानुका राजपक्षेने वेगवान अर्धशतकी भागीदारी केली. हसरंगा 36 धावांवर बाद झाल्यानंतर भानुकाने अखेरपर्यंत नाबाद राहत 71 धावा चोपल्या. त्याच्या या योगदानामुळे श्रीलंकेचा संघ 6 बाद 170 अशी मजल मारू शकला. पाकिस्तानसाठी हारिस रऊफने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 5 आणि फखर झमान शून्यावर बाद झाले. रिझवान व इफ्तिखार यांनी सावधगिरी बाळगत संघाची धावसंख्या पुढे नेली. मात्र, श्रीलंकेने त्यांना जास्त वेगाने धावा काढण्यास पायबंद घातला. वनिंदू हसरंगाने 17 व्या षटकात तीन बळी मिळवत श्रीलंकेचा विजय जवळपास निश्चित केला. डावाच्या अखेरच्या चेंडूवर नसीम शाहला बाद करत करूणारत्नेने पाकिस्तानचा डाव 147 धावांवर संपवत 23 धावांनी विजय संपादन केला. नाबाद अर्धशतक करणाऱ्या भानुका राजपक्षेला सामनावीर, तर हसरंगाला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: गंभीरच्या त्या कृतीने जिंकली कोट्यवधी चाहत्यांनी मने! आता श्रीलंकेतही जिंकू शकतो निवडणूक
पाकिस्तान का नाही बनला आशिया चषक 2022 चा चॅम्पियन, कर्णधार बाबरने सांगितले कारण
आशिया क्रिकेटवर ‘लंकाराज’! पाकिस्तानला लोळवत श्रीलंका आशियाचे चॅम्पियन