श्रीलंकेच्या संघाने शानदार खेळ दाखवत सहाव्यांदा आशिया चषकावर कब्जा केला. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंकेने विजेतेपद पटकावले. श्रीलंकेच्या संघाला स्पर्धेपूर्वी विजेतेपदाचा दावेदार म्हणून एक टक्काही मते मिळाली नव्हती. मात्र, 0 ते 100 टक्क्यांपर्यंतचा प्रवास संघाने दोन आठवड्यात पूर्ण केला. यानंतर संघावर अभिनंदनाचा वर्षाव झाला असून, सोशल मीडियावर प्रतिक्रियाही आल्या आहेत. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने देखील आपल्या नेहमीच्या मजेदार अंदाजात श्रीलंका संघाचे कौतुक केले. सोबतच पाकिस्तान संघाची टांग खिचाई करण्याची संधी सोडली नाही.
काय म्हणाला सेहवाग?
श्रीलंकेच्या विजयानंतर ट्विटरवर अनेक प्रतिक्रियांचा महापूर वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याने देखील ट्विट करत म्हटले, “श्रीलंका चांगला खेळला. आशियाचे विजेते म्हणण्यासारखे त्यांची कामगिरी झाली. ते अजून पुढील महिन्यात होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरले नाहीत. कल्पना करा हे किती मनोरंजक असते की, मुख्य फेरीसाठी पात्र नसलेल्या संघाकडून पराभूत झाल्यास तुमची पात्रता रद्द होईल? सबके तोते उड जाते.” सेहवाग नेहमीच आपल्या अशा मजेदार ट्विटसाठी चर्चेत असतो.
अंतिम सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. वेगवान गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत 60 धावांच्या आत श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला होता. मात्र, त्यानंतर वनिंदू हसरंगा व भानुका राजपक्षेने वेगवान अर्धशतकी भागीदारी केली. हसरंगा 36 धावांवर बाद झाल्यानंतर भानुकाने अखेरपर्यंत नाबाद राहत 71 धावा चोपल्या. त्याच्या या योगदानामुळे श्रीलंकेचा संघ 6 बाद 170 अशी मजल मारू शकला. पाकिस्तानसाठी हारिस रऊफने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 5 आणि फखर झमान शून्यावर बाद झाले. रिझवान व इफ्तिखार यांनी सावधगिरी बाळगत संघाची धावसंख्या पुढे नेली. मात्र, श्रीलंकेने त्यांना जास्त वेगाने धावा काढण्यास पायबंद घातला. वनिंदू हसरंगाने 17 व्या षटकात तीन बळी मिळवत श्रीलंकेचा विजय जवळपास निश्चित केला. डावाच्या अखेरच्या चेंडूवर नसीम शाहला बाद करत करूणारत्नेने पाकिस्तानचा डाव 147 धावांवर संपवत 23 धावांनी विजय संपादन केला. नाबाद अर्धशतक करणाऱ्या भानुका राजपक्षेला सामनावीर, तर हसरंगाला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पीसीबी अध्यक्षांना पराभव बोचला! भारतीय पत्रकाराशी केले गैरवर्तन; पाहा व्हिडिओ
श्रीलंकेच्या विजेतेपदाचे ‘धोनी कनेक्शन’; वाचा काय म्हणाला कॅप्टन शनाका
पाकिस्तान का नाही बनला आशिया चषक 2022 चा चॅम्पियन, कर्णधार बाबरने सांगितले कारण