मागील वर्षी पसरलेल्या कोविड-१९ (कोरोना) या आजाराची दुसरी लाट यावर्षी अधिक जोमाने आली आहे. संपूर्ण जगभरात खासकरून दक्षिण आशियात या आजाराने थैमान घातलेले दिसून येते. याचा सर्वाधिक फटका हा क्रीडाक्षेत्राला बसलेला आहे. ज्यामुळे अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. आशियातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया कप आयोजनाला या आजाराने पुन्हा एकदा खो दिला असून, ही स्पर्धा आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहे. जून महिन्यात आशिया कपचे आयोजन श्रीलंकेत करण्यात येणार होते.
झाली अधिकृत घोषणा
आशिया कप आयोजन रद्द करण्यात आल्याची घोषणा श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डिसिल्वा यांनी केली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, “कोरोनाची सद्यस्थिती पाहता आशिया कपचे आयोजन करणे शक्य होणार नाही. पुढील दोन वर्ष ही स्पर्धा होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण, या दोन वर्षाचा प्रत्येक संघाचा कार्यक्रम ठरलेला असतो.”
डिसिल्वा यांच्या या म्हणण्यानुसार पुढील आशिया कपचे आयोजन २०२३ विश्वचषकानंतरच होऊ शकते. हा विश्वचषक भारतात खेळविण्यात येणार आहे. नियोजित आशिया चषक २०२० मध्ये टी२० विश्वचषकापूर्वी भारतात खेळविण्यात येणार होता. मात्र तेव्हा कोरोनाची प्रकरणे गंभीररित्या समोर येत असल्याने ही स्पर्धा जून २०२१ मध्ये खेळविण्याविषयी निर्णय झालेला.
भारतीय संघ नसता झाला सहभागी
आशिया कपचे यावेळी आयोजन झाले असते तरी कदाचित भारतीय संघ यामध्ये सहभागी झाला नसता. कारण, याचवेळी भारतीय संघ इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळत असता. दुसरा पर्याय म्हणून, भारताचा दुय्यम संघ स्पर्धेत सहभागी होऊ शकला असता.
भारत आहे माजी विजेता
आशिया कप स्पर्धेवर भारतीय संघाने आतापर्यंत निर्विवादपणे वर्चस्व गाजवले आहे. भारतीय संघाने १९८४, १९८८, १९९०, १९९५, २०१०, २०१६ व २०१८ मध्ये या स्पर्धे वर नाव कोरले होते. यापैकी केवळ २०१६ सालची स्पर्धा ही टी२० प्रकारात खेळवली गेली होती. २०१८ मध्ये भारतीय संघाने अखेरच्या वेळी झालेली ही स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकलेली.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतात टी२० विश्वचषक होणार की नाही? पाहा कोणत्या दिवशी होणार हा महत्त्वाचा निर्णय
हे भारीयं! दरवेळी विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमी विराट कोहलीला विचारतो ‘हा’ महत्त्वाचा प्रश्न
विराटला नावे ठेवण्याआधी त्याने केलेले ‘हे’ काम नक्की पाहा, पाहा आता कुणाच्या आलाय मदतीला