भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने यावर्षी होणारी आशिया चषक स्पर्धा रद्द झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही स्पर्धा यावर्षी सप्टेंबरमध्ये होणार होती. परंतू कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा रद्द करण्यात आली असल्याचे त्याने सांगितले आहे.
गांगुलीने इंडिया टूडेच्या इंस्टाग्राम लाईव्ह चॅटवर बोलताना याबाबत पुष्टी केली आहे. त्याला विचारण्यात आले होते की भारतीय संघ पुन्हा मैदानात कधी उतरेल.
त्यावर गांगुलीने सांगितले, “कोणती मालिका भारतीय संघ पहिले खेळेल हे सांगणे कठिण आहे. कारण कोरोनाचे संकट कधी जाईल हे कोणालाही माहित नाही. त्यामुळे आपण सध्या वाट पाहू शकतो.”
“आम्ही सध्या जेव्हा पण भारतात पुन्हा क्रिकेट सुरु होईल त्याच्या तयारीसाठी सज्ज आहोत. पण त्याची अंमलबजावणी मैदानावरच करावी लागणार आहे. स्टेडियम खुले झाले आहेत परंतू खेळाडू कोरोना व्हायरसच्या भीतीने तिथे जात नाहीत. आम्हाला भारतात क्रिकेट सुरु करण्याची घाई नाही.”
तसेच गांगुलीने असेही सांगितले आहे की सध्यातरी आयपीएलसाठी कोणताही कालावधी (विंडो) निश्चित झालेला नाही. कारण पुढे टी२०विश्वचषकही आहे.
त्याचबरोबर गांगुली भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल आणि आशिया चषकाबद्दल म्हणाला, “सध्यातरी आमच्याकडे आयपीएलसाठी विंडो नाही. भारतीय संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा बदलता येणार नाही.”
“त्यामुळे भारतीय संघ पहिली पूर्ण मालिका डिसेंबरमध्ये खेळू शकतो. सप्टेंबरमध्ये होणारा आशिया चषक रद्द झाला आहे. त्यामुळे सध्यातरी भारतात पुन्हा कधी क्रिकेट सुरु होईल याबद्दल मी काही सांगू शकत नाही.”
आशिया चषकात आशिया खंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघ सहभागी होतात.
ट्रेंडिंग घडामोडी –
लेकीने बापाला वाढदिवसाला काय भेट द्यावं, हे ५ वर्षांच्या झिवा धोनीने जगाला दाखवून दिलं
तब्बल ११७ दिवसांनी सुरू झाले क्रिकेट; २५ वर्षात पहिल्यांदाच नाही दिसणार इंग्लंडचा १२वा खेळाडू
“येत्या १० वर्षात धोनी होणार सीएसकेचा बॉस”