एशिया कप (Asia Cup)स्पर्धेच्या 15व्या हंगामाचा पहिला सामना पार पडला. शनिवारी (27 ऑगस्ट) अफगानिस्तानने यजमान संघ श्रीलंकेवर 8 विकेट्सनेॊ विजय मिळवला. तर यामधील दुसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK)यांच्यात रविवारी (28 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच दोन्ही संघातील मुख्य खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी यांचा समावेश आहे. तर सौरव गांगुली यांना आफ्रिदीबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या खास अंदाजात दिले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly)यांना वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याच्याबाबत एक प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्यांनी एकदम खास अंदाजात त्याचे उत्तर दिले आहे. त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदीच्या अनुपस्थितीवर प्रश्न विचारला असता आपल्या विधानात जसप्रीत बुमराहचाही उल्लेख केला आहे.
भारताच्या या माजी कर्णधाराला मुलाखतीत विचारले की, “आफ्रिदीच्या या स्पर्धामध्ये न खेळण्याचा परिणाम पाकिस्तानला किती जाणवेल? या प्रश्नाचे उत्तर देताना गांगुली म्हणाले, “मला नाही वाटत एका खेळाडूच्या नसण्याने संघाला काही फरक पडेल. हा एक सांघिक खेळ आहे. तसेच आमच्याकडेही जसप्रीत बुमराह नाही.”
गांगुली यांनी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या पुनरागमनाबाबतही आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी म्हटले, “हार्दिक हा भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. तो मागील वर्षी दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकला नाही, तर आता तो पूर्णपणे फिट आहे. तसेच कोणी विचार केला होता की आयपीएल गुजरात टायटन्स जिंकेल. टी20 एक वेगळ्या प्रकारचा खेळ आहे. त्यामध्ये तुम्हाला पुढे येण्याच्या बऱ्याच संधी असतात.”
यंदाही भारतीय संघ एशिया कपमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. त्याने 2018च्या आवृत्तीत संघाला विजय मिळवून दिला आहेत. तसेच त्याने कर्णधार म्हणून 5 सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. त्या पाचही सामन्यात भारत जिंकला आहे.
एशिया कपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
राखीव खेळाडू- दीपक चाहर, श्रेयस अय्यर.