इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये मंगळवारी (28 आॅगस्ट) तिरंदाजीत भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना प्रत्येकी रौप्यपदक मिळाले आहे.
भारताच्या या दोन्ही संघांना अंतिम फेरीत दक्षिण कोरिया विरुद्धच पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही संघांचे अंतिम सामने अटीतटीचा झाले. महिला संघाला 228-231 अशा फरकाने पराभव पत्कारावा लागला. तर पुरुष संघाचा सामना शुटआॅफमध्ये गेला होता.
पुरुषांच्या अंतिम लढतीत चौथ्या सेटनंतर 229-229 अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे सामना शुटआॅफमध्ये गेला. परंतू शुटआॅफमध्येही दोन्ही संघानी प्रत्येकी 29 गुण मिळवत पुन्हा बरोबरी साधली.
त्यामुळे दोन्ही संघानी मारलेल्या अचूक बाणांचे अंतर तपासण्यात आले. ज्यात कोरियाच्या पुरुष संघाने बाजी मारली तर गतविजेत्या भारतीय पुरुष संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि अमन सैनी यांचा समावेश असणाऱ्या भारताच्या पुरुष संघाने या लढतीची चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या सेटमध्ये 60-56 अशी आघाडी घेतली होती. परंतू दुसरा सेट कोरियाने 54-58 असा जिंकत सामना 114-114 असा बरोबरीचा केला.
भारतीय संघाने तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा चांगला खेळ करत 58-56 अशी आघाडी मिळवली. परंतू पुन्हा एकदा कोरियाने चौथ्या सेटमध्ये ही आघाडी भरुन काढत बरोबरी केली.
त्यानंतर शुटआॅफमध्ये भारताने 9,10,10 असे गुण मिळवले तर कोरियाने 10,9,10 असे गुण मिळवले होते. अखेर त्यांनी मारलेल्या बाणांचे अंतर तपासण्यात आले.
भारतीय संघाचे थोडक्यात सुवर्णपदक हुकल्याने नाराज झालेला अभिषेक वर्मा म्हणाला, “अशा अंतिम सामन्याबद्दल तुम्ही काहिच म्हणू शकत नाही. तसेच वाऱ्याची दिशानेही महत्त्वाची भूमिका बजावली. आज आमचे नशीब वाईट होते.”
भारताच्या पुरुष संघाआधी महिला संघाचा अंतिम सामना पार पडला. हा सामना देखील अतीतटीचा झाला. भारतीय संघात समावेश असलेल्या मुस्कान किरार, मधूमीता कुमारी आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी चौथ्या सेटपर्यंत चांगली लढत दिली होती.
परंतू तिसऱ्या सेटपर्यंत 173-173 अशा बरोबरीच्या झालेल्या या सामन्यात अखेरच्या सेटमध्ये गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या महिला संघाने 58-55 अशा फरकाने आघाडी घेत सुवर्णपदक पटकावले.
त्याआधी भारतीय महिला संघाने पहिला सेट 59-57 असा जिंकला होता, तर दुसरा सेट कोरियाने 56-58 असा जिंकत बरोबरी केली. तसेच तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही संघानी 58-58 अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे अखेरचा सेटमधील 3 गुणांची आघाडी कोरियासाठी महत्त्वाची ठरली.
भारतीय महिला संघाने उपांत्यफेरीत चायनीज तैपईला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.
भारतीय महिला संघाने याआधी 2014 मध्ये याच स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: पीव्ही सिंधूचे ऐतिहासिक सुवर्ण हुकले, रौप्यपदकवार मानावे लागले समाधान
–एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक