-शारंग ढोमसे([email protected])
जकार्ता,इंडोनेशिया येथे होणाऱ्या आगामी आशियाई स्पर्धा,२०१८ साठी भारतीय पुरुष व महिला कबड्डी संघांची निवड अनुक्रमे १५ व १७ जून रोजी होणार आहे.आधीच निवड झालेल्या २९ खेळाडूंच्या संभाव्य यादीतून अंतिम संघ निवड होईल.
सध्या निवड झालेल्या संभाव्य खेळाडुंचे प्रशिक्षण शिबिर सोनिपत(पुरुष संघ) व गांधीनगर(महिला संघ) येथे चालू आहे(१५ मे ते ५ जून).
तत्पूर्वी ४२ संभाव्य खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर १५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान पार पडले होते.त्यातून २९ संभाव्य खेळाडूंची निवड केलेली आहे मात्र यात ४२ खेळाडूंच्या यादीत नसलेल्या मंजित चिल्लर,स्नेहल शिंदे,इ. खेळाडूंचाही समावेश करण्यात आलेला आहे.
पुरुषांचा संघ आशियाई स्पर्धेपूर्वी ‘कबड्डी मास्टर्स’ ही स्पर्धा खेळणार आहे.त्यामुळे ही स्पर्धा आशियाई स्पर्धेची रंगीत तालीम असेल. या स्पर्धेत भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली तर जवळपास हाच संघ आशियाई स्पर्धेत खेळेल.
त्यामुळे रिशांक देवाडिगा आणि गिरीश एरणाक या महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड निश्चित मानली जात आहे.तर महिला संघात फारसे बदल अपेक्षित नसून इराण येथे पार पडलेल्या आशियाई जेतेपद स्पर्धेचे जेतेपद पटकावलेला संघच कायम राहण्याची शक्यता आहे.
मात्र रेल्वेला फेडरेशन कप स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या सोनाली शिंगाटेला संघात स्थान मिळते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.