ओव्हलमध्ये टीम इंडियाचा (Team india) विजय निश्चित मानला जातो आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवट 2-2 अशा बरोबरीत होईल, असं चित्र आहे. हे आपण उगाचच म्हणत नाही, तर ओव्हलच्या मैदानाचा इतिहासही भारताच्या विजयाची शक्यता दाखवत आहे. दुसऱ्या डावात भारताची संपूर्ण टीम 396 धावांवर ऑलआउट झाली.
भारताने इंग्लंडसमोर 396 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडने 1 विकेट गमावून 82 धावा केल्या आहेत. कसोटीच्या चौथ्या दिवशीच निकाल लागण्याची शक्यता आहे. इंग्लंडला जर हा सामना जिंकायचा असेल, तर त्यांना एखादा चमत्कार घडवावा लागेल.
ओव्हलच्या मैदानावर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर कोणीही 300 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य यशस्वीपणे पार केलं नाही. चौथ्या डावात सर्वाधिक धावांचा पाठलाग करून विजय मिळवण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. 1902 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 263 धावांचं लक्ष्य 9 विकेट्स गमावून पार केलं होतं.
1963 मध्ये वेस्ट इंडीजने इंग्लंडविरुद्ध 252 धावांचं लक्ष्य यशस्वीरीत्या पार केलं होतं. पण 300 हून अधिक धावांचा पाठलाग आजवर या मैदानावर कुणीच पूर्ण केलेला नाही. त्यामुळे इंग्लंडला जर ही मालिका 3-1 ने जिंकायची असेल, तर त्यांना ओव्हलमध्ये इतिहास घडवावा लागेल.
वर्ष 2000 नंतर ओव्हलमध्ये फक्त एकदाच एखाद्या संघाने 200 पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य पार केलं आहे.
भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात करत इंग्लंडच्या फलंदाजीचा डाव कोलमडला आणि टीम इंडियाला सामन्यात परत आणलं. मोहम्मद सिराजच्या (Mohmmed Siraj) नेतृत्वाखाली गोलंदाजांनी पुन्हा एकदा तसंच प्रदर्शन करावं, अशी अपेक्षा आहे. पहिल्या डावात सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावातही सिराजने चांगली लय पकडली असून झॅक क्रॉलीची विकेट त्याने घेतली आहे.






