फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये नेहमीच वाद राहिला आहे. काश्मीर वाद असो, दहशतवादी कारवाया असो अथवा सिंधू नदीचे प्रकरण, कोणत्याच गोष्टींवर अद्याप ठोस उपाय निघाला नाही. दोन्ही देशांमध्ये सारंकाही आलबेल नसलं तरी, एक गोष्ट अशी आहे ज्यामुळे दोन्ही देश अनेकदा एकत्र येताना दिसतात. ती गोष्ट म्हणजे क्रिकेट. प्रकरण कोणतही असो, त्यावर चर्चा करायची असली तरी हे माध्यम क्रिकेटच असतं, आणि विरोध होणार असेल तर बंद होणारही क्रिकेटच असत. थोडक्यात झाली तर क्रिकेटच्या माध्यमातून चर्चा होते, अथवा भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायचे नाही असं ठरतं.
क्रिकेट डिप्लोमसी असं सुंदर नाव या साऱ्याला दिलं जात. या क्रिकेट डिप्लोमसीचे अनेकदा फायदा देखील झाले आहेत. अनेक छोट्याछोट्या मुद्द्यांवर याच क्रिकेट डिप्लोमसीमुळे तोडगा निघालाय. 2011 वर्ल्डकपला दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी एकत्र सेमीफायनलचा आनंद घेतल्याचं सबंध जगाने पाहिलं. मात्र, याच्या 8 वर्ष आधी सर्वात यशस्वी क्रिकेट डिप्लोमसी केली होती अटलबिहारी वाजपेयी यांनी. त्याचाच हा किस्सा.
सन 1999 मध्ये कारगिल युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान (India And Pakistan) यांच्यातील क्रिकेट पूर्णपणे बंद झाले. टीम इंडियाने आपल्या या कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध, वर्ल्डकप मॅच सोडून बरेच दिवस क्रिकेट खेळले नव्हते. त्यानंतर 2004 साली संधी चालून आली, जेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत करण्यासाठी क्रिकेटचा मार्ग निवडला. त्याचवर्षी, वाजपेयी सार्क परिषदेसाठी पाकिस्तानला गेले. तिथे भारत-पाकिस्तान क्रिकेटविषयी देखील चर्चा झाली. त्यानंतर भारत सरकारने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाला तीन टेस्ट आणि पाच वनडेची सीरिज खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिली. टीम इंडिया तब्बल 19 वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर पाकिस्तानात जात होती. वाजपेयींच्या या निर्णयाचे सीमेच्या दोन्ही बाजूंनी खूप कौतुक झाले.
पाकिस्तान टूरची रूपरेषा ठरली तेव्हा, तत्कालीन टीम इंडिया मॅनेजर रत्नाकर शेट्टी हे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानात गेले. त्यावेळी पाकिस्तानातील लोक एअरपोर्ट, रस्ते आणि पब्लिक प्लेसमध्ये वाजपेयींच्या आभाराचे पोस्टर घेऊन उभे होते. दोन्ही देशातील क्रिकेट संबंध सुधारावेत असेच सर्वांना वाटत होते. त्यांच्यासाठी वाजपेयी हिरो झालेले. ही गोष्ट शेट्टी यांनी वाजपेयींना सांगितली तेव्हा ते हसून म्हणाले होते, “ही चांगली गोष्ट आहे आता पाकिस्तानात निवडणूक लढवायलाही सोपे जाईल.”
टीम इंडियाच्या पाकिस्तान टूरला परवानगी देण्याचेच काम वाजपेयींनी केले नाही, तर टीम जेव्हा पाकिस्तान रवाना होणार होती, त्याच्या काही दिवस आधी वाजपेयींनी पूर्ण टीमला आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले. त्यांच्याशी तासभर गप्पा मारल्या. खेळाडू जाण्यास निघाले असताना पंतप्रधानांनी कर्णधार सौरव गांगुलीकडे एक बॅट सुपूर्द केली. त्यावर लिहिले होते, “खेल ही नही नही दिल भी जीतिए”. इतकेच नव्हे, तर ज्यावेळी खेळाडू लॉनमधून गेटकडे चालले होते, तेव्हा “हम होंगे कामयाब” या गाण्याची धूनदेखील वाजवली गेली.
ती टूर इतकी लोकप्रिय आणि सक्सेसफुल झाली की, टूरवरील प्रत्येक मॅच आणि प्रत्येक इनिंग क्रिकेटप्रेमींच्या अजूनही लक्षात आहे. सेहवाग याच टूरवर मुलतानचा सुलतान बनला. सचिन 194 वर नाबाद असताना टीम इंडियाचा डाव घोषित केला गेला. गांगुली, द्रविड यांनीदेखील लक्षात राहील असा परफॉर्मन्स दिला. स्माईलिंग असेशन म्हणून बालाजी आणि झहीरवर पाकिस्तानातील पोरी फिदा झाल्या. आणि या सर्वावर चार चाँद म्हणजे टीम इंडियाने दोन्ही सीरिज जिंकल्या. टीम इंडिया जिंकल्यावर त्यांना भारतातून जाणारा अभिनंदनाचा पहिला फोन हा त्या ऐतिहासिक टूरची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाच होता.
त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा टीम इंडिया पाकिस्तानात देखील यश भारताच्याच पदरी पडलं. 26/11 हल्ल्यानंतर पुन्हा भारत-पाकिस्तान क्रिकेट बंद झाले. 2013 मध्ये एकच एक छोटी सिरीज भारतात खेळली गेली. मात्र, याव्यतिरिक्त क्रिकेट डिप्लोमसी चालली नाही. आता फक्त आयसीसीच्या ट्रॉफीमध्ये दोन्ही संघ भेटतात. दोन्ही देशांची एक पिढी गेलीये ज्यांनी भारत-पाकिस्तान टेस्ट पाहिली नाही. क्रिकेटविश्वावर राज्य करणारा विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध टेस्ट खेळण्याची वाट पाहतोय. कदाचित विराटही मनातल्या मनात म्हणत असेल, आजवरची सर्वात यशस्वी क्रिकेट डिप्लोमसी करणारे वाजपेयी असते, तर मलादेखील पाकिस्तानविरुद्ध टेस्ट खेळायला मिळालीच असती…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वेळप्रसंगी रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवला, पण ब्लड कॅन्सरमुळेच झाला विंडीजच्या दिग्गजाचा अंत
कपिल पाजींच्या खिलाडूवृत्तीमुळे टीम इंडियाला पत्करावा लागलेला पराभव, पण जगभरात झालेलं कौतुक