गोवा दिनांक २९ जानेवारी – एससी ईस्ट बंगाल व एटीके मोहन बागान हा ‘कोलकाता डर्बी’चा सामना कमालीचा चुरशीचा झाला. इंडियन सुपर लीगमधील ( आयएसएल) या लढतीनं फुटबॉल चाहत्यांना अखेरच्या मिनिटापर्यंत खिळवून ठेवले. दोन्ही संघांनी विजयाची समसमान संधी गमावली. डेव्हिड विलियम्सला पेनल्टीवर गोल करता आला नाही. लिस्टन कोलॅसोनं गोल करण्याचे भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यालाही यश मिळाले नाही. पण, या सर्वाची भरपाई बदली खेळाडू कियान नासिरीनं केली. ६०व्या मिनिटापर्यंत ०-१ असा पिछाडीवर असलेल्या मोहन बागाननं ६१व्या मिनिटाला कियान नासिरीला पाचरण केलं अन् त्यानं पुढील ३० मिनिटांत ३ गोल करून संघाला विजय मिळवून दिला.
टॉप फोरच्या शर्यतीत आव्हान कायम राखण्यासाठी एटीके मोहन बागानला विजय मिळवणे अनिवार्य होते आणि त्यामुळेच एससी ईस्ट बंगालविरुद्धच्या लढतीत ते जपून खेळताना दिसले. १२व्या मिनिटाला त्यांची बचावफळी चूकलीच अन् ईस्ट बंगलाच्या अँटोनियो पेरोसेव्हिचनं संधी साधली, परंतु त्याचा शॉट ऑन टार्गेट एवढा कमकुवत होता की गोलरक्षक अमरिंदर सिंगनं तो सहज रोखला. मोहन बागानच्या खेळाडू पेनल्टी क्षेत्रावर हावी झालेले दिसत होते, पण ईस्ट बंगालची बचावफळी तेवढीच सावध होती. १३व्या मिनिटाला ईस्ट बंगालच्या महेश सिंगनं वन ऑन वन ची संधी गमावली. २५व्या मिनिटाला मोहन बागानच्या बचावफळीनं पुन्हा चूक केली. मार्सेलो रिबेईरो व मोहन बागानचा गोलरक्षक अमरिंदर समोरासमोर होते. मार्सेलोला फक्त संधी साधून चेंडू गोलजाळीत पाठवायचा होता, परंतु सोपी संधी गमावल्याची खंत त्याच्या चेहऱ्यावर दिसली. ईस्ट बंगालनं या सामन्यातील सर्वात सोपी संधी गमावली.
मोहन बागानचे खेळाडू उजव्या बाजूनं सातत्यानं पेनल्टी क्षेत्रात आक्रमण करत होते. ईस्ट बंगालची बचावफळी तितक्याच ताकदीनं त्यांना उत्तर देताना दिसली. ३८व्या मिनिटाला प्रितम कोटल याला गोलपोस्ट जवळूनही हेडरद्वारे गोल करता आला नाही. मोहन बागाननं ही सोपी संधी गमावली. पहिल्या हाफमध्ये मोहन बागाननं चेंडूवर अधिककाळ ताबा राखून गोल करण्याच्या ६ संधी निर्माण केल्या, परंतु ईस्ट बंगालचा बचाव तितकाच अभेद्य राहिला. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये गोलपाटी ०-० अशी बरोबरीचीच राहिली.
ईस्ट बंगालचा बचावपटू अंकित मुखर्जी याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागल्यानं दुसऱ्या हाफमध्ये संघानं त्याच्या जागी मध्यरक्षक अमरजीत कियामला मैदानावर उतरवले. ४७व्या मिनिटाला लिस्टन कोलासोनं डाव्या बाजूनं बॉक्स बाहेरून मारलेला चेंडू गोलरक्षकाला चकवून गोलजाळीत विसावण्याच्या दिशेनं गेला, परंतु क्रॉसबारला लागल्यानं मोहन बागानचा गोल झाला नाही. पुढच्याच मिनिटाला सुभासिश बोसचा बॉक्सच्या आतून हेडरद्वारे केलेला प्रयत्नही फसला. आतापर्यंत बचावात्मक मोडमध्ये असलेल्या ईस्ट बंगालनं गिअर बदलला अन् ५५व्या मिनिटाला पेरोसेव्हिचनं मारलेला शॉट ऑन टार्गेट अमरिंदरनं सुरेखरित्या रोखला. पण, मिळालेल्या कॉर्नवर पेरोसेव्हिचच्या पासवर डॅरेन सिडोएलनं चतुराईनं गोल करत ईस्ट बंगालला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
पिछाडीनंतर मोहन बागानचा खेळ अधिक आक्रमक झाला आणि त्यात संघात काही बदलही करण्यात आले. दीपक तांग्रीच्या जागी कियान नासिरीला उतरवण्याचा डाव यशस्वी ठरला. ६४व्या मिनिटाला कियान नासिरीनं मोहन बागानला बरोबरीचा गोल करून दिला. ६६व्या मिनिटाला अरमजीत कियामनं बॉक्समध्ये लिस्टन कोलासोला पाडले अन् अम्पायरनं पेनल्टी दिली. पण, डेव्हिड विलियम्सनं ही आयती संधी गमावली, कोलकाता डार्बीचं दडपण तो पेलू शकला नाही आणि त्यानं चेंडू गोलजाळीत मारण्याऐवजी गोलपोस्टवर मारला. मोहन बागानचे सारे खेळाडू स्तब्ध झाले. ६९व्या मिनिटाला मोहन बागाननं आघाडीची आणखी एक संधी गमावली. आतापर्यंत अभेद्य वाटणाऱ्या ईस्ट बंगालच्या बचावफळीचा खेळ विस्कळीत होताना दिसला. पण, मोहन बागानला संधी साधण्यात अपयश येताना दिसले.
८०व्या मिनिटाला ईस्ट बंगालनं गोलची संधी निर्माण केली, परंतु बॉक्समधून लाल्रीनलियाना हनाम्टेला गोलरक्षक अमरिंदरला चकवता आले नाही. इथे ईस्ट बंगालनं २-१ अशी सहज आघाडी घेतली असती. ८६व्या मिनिटाला लिस्टन कोलासोनं मारलेला चेंडू गोलजाळीत जाण्यापासून हिरा मोंडलनं हेडरद्वारे अडवला. इथे ईस्ट बंगालचा गोलरक्षक पूर्णपणे हतबल झाला होता. ९३व्या मिनिटाला कियान नासिरीनं रिबाऊंड मारून मोहन बागानला २-१ अशी आघाडी मिळवून दिली अन् मैदानावर भारी जल्लोष झाला. पुढच्याच मिनिटाला कियाननं हॅटट्रिक पूर्ण करून मोहन बागानचा विजय पक्का केला. या विजयासह मोहन बागाननं १९ गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली.
निकाल – एटीके मोहन बागान ३ ( कियान नासिरी ६४ मि., ९० +३ मि, ९०+५ मि. ) विजयी विरुद्ध एससी ईस्ट बंगाल १ ( डॅरेन सिडोएल ५६ मि. ).