---Advertisement---

आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून बेंगळुरू पराभूत

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 10:24 PM
---Advertisement---

गोवा: हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात बेंगळुरू एफसीला मंगळवारी एटीके मोहन बागानकडून 0-2 असे पराभूत व्हावे लागले.

फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. फिजीचा 33 वर्षीय आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर रॉय कृष्णा याने एटीकेएमबीचे खाते पेनल्टीवर उघडले. पहिल्या सत्रातील 44व्या मिनिटाला आघाडी फळीतील ब्राझीलचा 33 वर्षीय खेळाडू मार्सेनिलियो याने संघाचा दुसरा गोल केला. मध्यंतराची ही आघाडी एटीकेएमबीने अबाधित राखली.

माजी विजेत्या बेंगळुरूला एटीकेएमबीच्या बचाव फळीने दाद लागू दिली नाही. आंतरराष्ट्रीय कर्णधार सुनील छेत्री याला भरपाई वेळेत पंचांशी वाद घातल्यामुळे यलो कार्डला सामोरे जावे लागले. हा निकाल बेंगळुरूसाठी निराशाजनक ठरला. त्यामुळे बाद फेरीच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्यात जमा आहेत. चार सामन्यांतील त्यांची अपराजित मालिका संपुष्टात आली.

एटीकेएमबीने या विजयासह दुसरे स्थान आणखी भक्कम केले. 16 सामन्यांत त्यांनी दहावा विजय मिळविला असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 33 गुण झाले. आता आघाडीवरील मुंबई सिटी एफसीपेक्षा त्यांचा संघ एकाच गुणाने मागे आहे, तर तीन ते पाच या क्रमांकांवरील प्रतिस्पर्ध्यांवर त्यांनी दहा गुणांची आघाडी घेतली आहे. मुंबई सिटीप्रमाणेच एटीकेएमबीनेही दहा विजय नोंदविले आहेत.

बेंगळुरूला 17 सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. चार विजय व सात बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 19 गुण व सहावे स्थान कायम राहिले. पाचव्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेडपेक्षा त्यांचा संघ चार गुणांनी मागे आहे. त्यांचा एक सामना जास्त झाला आहे. याशिवाय गोलफरकही उणे आहे.

एटीके मोहन बागानने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. 35व्या मिनिटाला बेंगळुरूचा बचावपटू प्रतिक चौधरी याने कृष्णाला गोलक्षत्रात फाऊल केले. त्यामुळे रेफरी ए. रोवन यांनी एटीकेएमबीला पेनल्टी बहाल केली. पंचांच्या या निर्णयावर बेंगळुरूच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. या पेनल्टीवर कृष्णानेच गोल केला. बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याचा फटक्याच्या दिशेचा अंदाज चुकला.

पूर्वार्धाच्या अखेरीस बेंगळुरूचा मध्यरक्षक हरमनज्योत खाब्रा याने एटीकेएमबीचा स्ट्रायकर डेव्हिड विल्यम्स याला पाडले. त्यामुळे एटीकेएमबीला फ्री किक बहाल करण्यात आली. त्यावर मार्सेलिनियोने अफलातून कौशल्य प्रदर्शित करीत नेटच्या डाव्या कोपऱ्याच चेंडू मारताना प्रतिस्पर्धी गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला हुलकावणी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

आयएसएल २०२०-२१ : सहा गोलांच्या थरारात मुंबई सिटी-गोवा बरोबरी

आयएसएल २०२०-२१ : हैदराबाद-नॉर्थईस्ट युनायटेडची गोलशून्य बरोबरी

आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून ओदीशाचा धुव्वा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---