गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात शनिवारी कोलकत्याच्या मातब्बर एटीके मोहन बागानने गुणतक्त्यात तळात असलेल्या ओदिशा एफसीवर 4-1 असा दमदार विजय मिळविला. युवा भारतीय मानवीर सिंग आणि फिजीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू रॉय कृष्णा यांचे दोन गोल बहुमोल ठरले.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. पंजाबच्या 25 वर्षीय मानवीरने 11व्या मिनिटालाच ओदीशाचे खाते उघडले होते. त्यानंतर पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत ओदीशाला मध्य फळीतील दक्षिण आफ्रिकेचा 31 वर्षीय खेळाडू कोल अलेक्झांडर याने बरोबरी साधून दिली. दुसऱ्या सत्रात एटीकेएमबीने जोरदार प्रतिकार केला. मानवीरने 54व्या मिनिटाला गोल करीत संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर कृष्णाने चार मिनिटांत दोन गोल केले.
एटीके मोहन बागानचा हा 15 सामन्यांतील नववा विजय असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 30 गुण झाले. त्यांचे दुसरे स्थान कायम राहिले. आघाडीवरील मुंबई सिटी एफसीपेक्षा ते तीन गुणांनी मागे आहेत. मुंबई सिटीने 15 सामन्यांतून 10 विजयांसह 33 गुण मिळविले आहेत. एफसी गोवा, हैदराबाद एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी या तीन संघांची 15 सामन्यांतून 22 गुण अशी समान कामगिरी आहे. यात गोव्याचा गोलफरक 5 (21-16) सरस आहे. त्यामुळे गोवा तिसरा आहे. त्यानंतर हैदराबाद 4 (20-16) गोलफरकासह चौथा, तर नॉर्थईस्ट युनायटेड 1 (21-10) पाचवा आहे.
ओदीशाला 15 सामन्यांत नववा पराभव पत्करावा लागला. त्यांचे आठ गुण व शेवटचे 11वे स्थान कायम राहिले.
खाते उघडण्याची शर्यत एटीकेएमबीने जिंकली. 11व्या मिनिटाला मानवीरच्या अप्रतिम गोलच्या जोरावर एटीकेएमबीने खाते उघडले. आघाडी फळीतील मार्सेलिनीयो याने बॉक्सच्या बाहेर डावाकडून ही चाल रचली. त्याने मध्यरक्षक प्रोणय हलदर याला पास दिला. त्यावेळी पेनल्टी क्षेत्राबाहेर असलेल्या हलदर याने उजवीकडील रॉय कृष्णा याच्याकडे चेंडू सोपविला. त्याच्याकडून पास मिळताच मानवीरने डाव्या पायाने सफाईदार फटका मारत फिनिशींग केले.
पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत ओदिशाने बरोबरी साधली. मध्य फळीतील कोल अलेक्झांडर याने हा गोल केला. मध्यरक्षक पॉल रॅमफँगझुवा याने मध्य क्षेत्रातून चाल रचली. त्याने लांबून प्रयत्न केला, पण एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदर भट्टाचार्य याने झेपावत चेंडू थोपविला. त्यावेळी एटीकेएमबीचा बचावपटू प्रीतम कोटल चेंडू अडवू शकला नाही. त्यामुळे पुन्हा मिळालेल्या संधीचा फायदा उठवित अलेक्झांडर याने अरींदमच्या डावीकडून चेंडू नेटमध्ये घालवला.
दुसऱ्या सत्रात मानवीरने कृष्णाच्या चालीवर फिनिशींग केले. अलेक्झांडरला चकवून कृष्णाने उजवीकडून दिलेल्या पासवर मानवीरने मैदानालगत ताकदवान फटका मारत ओदीशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला चकविले.
अंतिम टप्प्यात एटीकेएमबीने प्रतिआक्रमण रचले. 82व्या मिनिटाला हलदरने मारलेला चेंडू अडविण्याचा प्रयत्न अलेक्झांडरने केला, पण चेंडू त्याच्या हाताला लागला. त्यामुळे रेफरी तेजस नागवेकर यांनी एटीकेएमबीला पेनल्टी बहाल केली. कृष्णाने पवित्रा घेतला आणि अर्शदीप जागचा हलताच फटका शांतचित्ताने अचूक फटका मारला.
मग मानवीरने हेडिंगवर निर्माण केलेल्या संधीचे कृष्णाने फिनिशींग केले. त्यावेळी त्याने ओदीशाचा बदली बचावपटू शुभम सारंगी याला दाद लागू दिली नाही.
महत्वाच्या बातम्या:
राज्य निवडचाचणी कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पैलवान अमोल मुंढे विजयी! आता गाजवणार पंजाबचं मैदान
सिराज-कुलदीपमध्ये झाली हमरातुमरी?, व्हिडिओ होतोय व्हायरल
BAN vs WI : मोमिनुलची कॅप्टन्स इनिंग, बांगलादेशविरुद्ध वेस्टइंडीज पराभवाच्या छायेत