गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शुक्रवारी एटीके मोहन बागानने कोलकता डर्बीत एससी ईस्ट बंगालला 3-1 असे हरविले. स्वयंगोल होऊनही एटीकेएमबीच्या विजयावर परिणाम झाला नाही. स्पेनच्या अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या एटीकेएमबीने आघाडी भक्कम केली. फिजीच्या रॉय कृष्णाने एक गोल व दोन गोलांमध्ये साथ अशी चमक दाखविली.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. आघाडी फळीतील फिजीचा 33 वर्षीय आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर रॉय कृष्णा याने 15व्या मिनिटाला एटीकेएमबीचे खाते उघडले. त्यानंतर मध्यंतरास चार मिनिटे बाकी असताना एटीकेएमबीच्या बचाव फळीतील स्पेनचा 29 वर्षीय खेळाडू टिरी याच्याकडून स्वयंगोल झाला. त्यामुळे मध्यंतरास 1-1 अशी बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात एटीकेएमबीकडून 72व्या मिनिटाला आघाडी फळीतील ऑस्ट्रेलियाचा 32 वर्षीय डेव्हिड विल्यम्स, तर एक मिनीट बाकी असताना मध्य फळीतील स्पेनचा 31 वर्षीय बदली खेळाडू जेव्हियर हर्नांडेझ याने गोल केला.
एटीकेएमबीने 18 सामन्यांत 12वा विजय मिळविला असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 39 गुण झाले. मुंबई सिटी एफसीवरील आघाडी त्यांनी पाच गुणांनी वाढविली, मात्र मुंबईचा एक सामना बाकी आहे. 17 सामन्यांतून 34 गुण अशी मुंबईची कामगिरी आहे.
ईस्ट बंगालला 18 सामन्यांत 11वा पराभव पत्करावा लागला. एक विजय व सहा बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 9 गुण व अखेरचे 11वे स्थान कायम राहिले.
एटीकेएमबीने सुरुवात दमदार केली. 15व्या मिनिटाला टिरीने उजवीकडून आगेकूच केली. त्याने डाव्या पायाने लांबवर मारलेला चेंडू कृष्णाने मिळविला. त्यानंतर कौशल्याने घोडदौड करीत कृष्णाने पेनल्टी क्षेत्रात प्रवेश करीत फिनिशींग केले. पहिल्या सत्रात चार मिनिटे बाकी असताना ईस्ट बंगालचा बचावपटू राजू गायकवाड याने उजव्या बाजूला थ्रो-इन केले. त्याने गोलक्षेत्रात चेंडू फेकला. तो अडविण्याच्या प्रयत्नात टिरीकडून स्वयंगोल झाला.
72व्या मिनिटाला ईस्ट बंगालचा गोलरक्षक सुब्रत पॉस याने मध्यरक्षक मॅट्टी स्टेनमन याच्या दिशेने चेंडू मारला. स्टेनमन याने बचावपटू डॅनिएल फॉक्स याच्या दिशेने फटका मारला. फॉक्सने मारलेल्या चेंडूवर कृष्णाने चपळाईने नियंत्रण मिळविले आणि विल्यम्सकरीता संधी निर्माण केली. विल्यम्सने मग पॉलला चकवित अप्रतिम फटक्यावर फिनिशींग केले. त्यानंतर कृष्णाच्याच चालीवर हर्नांडेझ याने हेडिंगवर गोल केला.
संबंधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : मॅचादोच्या भरपाई वेळेतील पेनल्टी गोलने नॉर्थईस्टला तारले
आयएसएल २०२०-२१ : ओदीशावरील विजयासह एफसी गोवा संघाची बाद फेरीत स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच
आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सचा धुव्वा उडवित हैदराबाद तिसऱ्या स्थानी