---Advertisement---

आयएसएल २०२०-२१ : ओदीशावरील विजयासह एफसी गोवा संघाची बाद फेरीत स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 12:02 AM
---Advertisement---

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात एफसी गोवा संघाने बाद फेरीत स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच कायम राखली. तळातील ओदीशा एफसीवर 3-1 अशा निर्णायक विजयासह गोव्याने तीन गुणांची कमाई केली. यामुळे गुणतक्त्यात त्यांना चौथा क्रमांक गाठता आला.

फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतरास गोव्याकडे 2-1 अशी आघाडी होती. गोव्याचे खाते 18व्या मिनिटाला मध्य फळीतील स्पेनच्या 31 वर्षीय अल्बर्टो नोग्युराने उघडले. त्यानंतर 26व्या मिनिटाला मध्य फळीतील स्पेनच्या 28 वर्षीय जोर्गे ओर्टीझ याने गोल केला. ओदिशाने चार मिनिटांत खाते उघडले. आघाडी फळीतील ब्राझीलच्या 29 वर्षीय दिएगो मॉरीसिओ याने हा गोल केला. दुसऱ्या सत्रात गोव्याकडून बचाव फळीतील स्पेनच्या 31 वर्षीय इव्हान गोंझालेझ याने गोल केला.

गोव्याने 18 सामन्यांत सहावा विजय मिळविला असून नऊ बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 27 गुण झाले. त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला एका गुणाने मागे टाकले, तर हैदराबाद एफसीला गुणांवर गाठले. मात्र हैदराबादचा गोलफरक केवळ एकने सरस आहे. हैदराबादचा गोलफरक 8 (25-17), तर गोव्याचा 7 (29-27) असा आहे. नॉर्थईस्टचा एक सामना बाकी आहे. 17 सामन्यांतून 26 गुण अशी नॉर्थईस्टची कामगिरी आहे.

खाते उघडण्याची शर्यत अपेक्षेप्रमाणे गोव्याने जिंकली. 18व्या मिनिटाला गोव्याचा बचावपटू इव्हान गोंझालेझ याने डावीकडून मुसंडी मारत अप्रतिम फटका मारला. गोलक्षेत्रालगत त्याने नेटच्या दिशेने चेंडू मारताच नोग्युराने उडी घेत हेडिंग केले आणि ओदीशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला चकविले.

26व्या मिनिटाला गोव्याचा दुसरा गोल झाला. प्रतिआक्रमणावर गोव्याने ही कामगिरी केली. प्रारंभी ओदीशाला डावीकडे कॉर्नर मिळाला होता. मध्यरक्षक ब्रॅड इनमन याने तो घेतला. त्याने मारलेला चेंडू गोव्याचा गोलरक्षक धीरज सिंगने थोपविला. हा चेंडू गोव्याचा मध्यरक्षक सेव्हीयर गामा याने चपळाईने ताब्यात घेतला आणि ओर्टीझला पास दिला. मार्किंग नसल्याचा फायदा उठवित ओर्टीझने मुसंडी मारली. त्यावेळी अर्शदीप पुढे सरसावला, पण ओर्टीझने दडपण न घेता सहजतेने फिनिशींग केले. त्याने अर्शदीपच्या डोक्यावरून चेंडू नेटमध्ये मारला.

ओदीशाने त्यानंतर चार मिनिटांत खाते उघडले. इनमन याने मध्य क्षेत्रातून ही चाल रचली. त्याने डावीकडून बचावपटू राकेश प्रधानला पास दिला. त्याचा फटका मारण्यासाठी गोव्याचा गोलरक्षक धीरजने उडी घेतली, पण तो चेंडू अडवू शकला नाही. मॉरीसिओने मग फिनिशींग केले.

दुसऱ्या सत्रात गोव्याचा एकूण तिसरा गोल कॉर्नरवर गोंझालेझने केला. डावीकडे मिळालेला कॉर्नर ओर्टीझने घेतला. गोंझालेझचा फटका अर्शदीपने थोपविला होता. पण रिबाऊंडवर गोंझालेझने लक्ष्य साधले.

महत्त्वाच्या बातम्या –

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सचा धुव्वा उडवित हैदराबाद तिसऱ्या स्थानी

आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीला पराभवाचा धक्का देत बेंगळुरूने राखल्या बाद फेरीच्या आशा कायम

आयएसएल २०२०-२१ : जमशेदपूरला हरवून एटीके मोहन बागानची आघाडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---