ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारपासून (१५ जानेवारी) सुरु होणार आहे. हा सामना २०२०-२१ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे त्यामुळे भारतीय संघ दौऱ्याचा शेवट हा सामना जिंकून मालिका विजयासह गोड करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल, तर घरच्या मालिकेत विजय मिळवण्याचा आणि ब्रिस्बेन येथील गेल्या ३ दशकाचा विजयी इतिहास कायम राखण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलिया संघ खेळेल.
मालिकेतील स्थिती –
ब्रिस्बेन येथे होणारा हा सामना कसोटी मालिकेतील निर्णायक सामना आहे. कारण या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता, तसेच तिसरा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना जो जिंकेल तो संघ मालिका जिंकेल. तर जर हा सामना अनिर्णित राहिला तर मालिकाही बरोबरीत सुटेल.
ब्रिस्बेनला होणारा हा सामना १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान होणार असून या सामन्यातील खेळाला प्रत्येक दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५.३० वाजता सुरुवात होणार आहे.
पावसाची शक्यता –
या सामन्यातील बराच वेळ पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. कारण हवामानाच्या अंदाजानुसार या सामन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता दाट आहे.
भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल –
या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल होणार, हे निश्चित आहे. कारण अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही. तसेच हनुमा विहारीला देखील सिडनी येेथे तिसरा कसोटी सामना खेळताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो देखील या सामन्यात खेळणार नाही. याबरोबरच जसप्रीत बुमराहच्या ओटीपोटात ताण आल्याने त्याचीही ब्रिस्बेन कसोटीत खेळण्याची शक्यता जवळपास नाही, तर आर अश्विनही पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. पण तो या सामन्यात खेळू शकतो.
तरीही नेहमीप्रमाणे बीसीसीआयने सामन्याच्या आदल्या दिवशी अंतिम ११ जणांच्या संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी आता अंतिम ११ जणांचा संघ काय असेल, हे सामन्याच्या नाणेफेकीवेळीच कळेल. तरी या सामन्यात दुखापतग्रस्त खेळाडूंना बाहेर बसवून त्याजागी शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि मयंक अगरवाल यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियन संघात पुकोस्कीच्या जागेवर मार्कस हॅरीसला संधी –
ऑस्ट्रेलियाने बुधवारी(१४ जानेवारी) त्यांचा अंतिम ११ जणांचा संघ जाहीर केला आहे. त्यांनी दुखापतग्रस्त विल पुकोस्कीच्या जागेवर मार्कस हॅरीसला संधी दिली आहे. पुकोस्कीला सिडनी येथे भारताविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळताना क्षेत्ररक्षणावेळी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात खांद्याला दुखापत झाली होती. या एका बदलाव्यतिरिक्त बाकी कोणताही बदल ब्रिस्बेन कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या ११ जणांच्या संघात केला जाणार नाही.
ब्रिस्बेन इतिहास –
ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यांचा इतिहास पाहाता ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. कारण त्यांनी गेल्या ३ दशकात म्हणजे १९८८ पासून ऑस्ट्रेलिया संघ ब्रिस्बेन येथे पराभूत झालेला नाही. गेल्या ३१ सामन्यात त्यांनी २४ विजय मिळवले असून ७ सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेन येथे आत्तापर्यंत ६ कसोटी सामने झाले आहेत. त्यातील १ सामना अनिर्णित राहिला आहे, तर ५ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत.
कधी, कुठे आणि केव्हा होणार सामना घ्या जाणून –
१. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा कसोटी सामना केव्हा होणार?
– ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा कसोटी सामना १५ ते १९ जानेवारी दरम्यान खेळला जाणार आहे.
२. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा कसोटी सामना कुठे खेळवला जाणार ?
– ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा कसोटी सामना द गॅबा स्टेडियम, ब्रिस्बेन येथे खेळवला जाईल.
३. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा कसोटी सामना किती वाजता सुरु होणार ?
– ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५.३० वाजता सुरु होईल. त्याआधी पहाटे ५.०० वाजता नाणेफेक होईल.
४. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी नेटवर्कच्या सोनी सिक्स, सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 या चॅनेलवर पाहता येईल.
५. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन Sony Liv app वर पाहाता येईल.
ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ –
डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लॅब्यूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, टीम पेन (कर्णधार/यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवूड.
भारताचा संभावित ११ जणांचा संघ –
शुभमन गिल, रोहित शर्मा(उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत, मयंक अगरवाल, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या –
हॉटेलच्या खोलीत येताच आर अश्विन लागला होता रडायला, पत्नीचा खुलासा
‘मला धक्काच बसला’, पंतचा बॅटींग मार्क पुसण्याच्या आरोपानंतर स्टीव्ह स्मिथची प्रतिक्रिया
AUS v IND : निर्णायक चौथ्या कसोटीत पाऊस बनणार व्हिलन? पाहा कसे असेल ब्रिस्बेनचे हवामान






